ज्योतीने सावरले मोडणारे दीड हजार संसार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:45 AM2018-10-16T00:45:53+5:302018-10-16T00:46:12+5:30

‘भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्यातच आनंद खरा’ हा सुखी संसाराचा मंत्र घेऊन सातारा येथील महिला व बालकल्याण विभागाच्या समुपदेशक ज्योती जाधव यांनी आठ वर्षांत तब्बल दीड हजार संसार मोडता-मोडता सावरले आहेत.

Hundreds of thousands of people flouting Jyoti ... | ज्योतीने सावरले मोडणारे दीड हजार संसार...

ज्योतीने सावरले मोडणारे दीड हजार संसार...

googlenewsNext

- स्वप्नील शिंदे

‘भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्यातच आनंद खरा’ हा सुखी संसाराचा मंत्र घेऊन सातारा येथील महिला व बालकल्याण विभागाच्या समुपदेशक ज्योती जाधव यांनी आठ वर्षांत तब्बल दीड हजार संसार मोडता-मोडता सावरले आहेत. अनेक चांगल्या-वाईट अनुभवांचे धडे घेत या रणरागिणीने अनेक दाम्पत्यांना सुखी संसारात पुन्हा गुंफले. अनेक निरपराध मुलांना त्यांचे आई-वडील मिळवून देण्याचे काम त्यांनी समुपदेशन केंद्र्राच्या माध्यमातून केले.


घरगुती हिंसाचारासह अनेक घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा घटनांनी पोलिसांची डोकेदुखी वाढली असताना महिला व बालविकास विभागाच्या समुपदेशकांच्या कार्यामुळे असे गुन्हे दाखल होण्याआधीच त्यांच्यातील हेवेदावे संपविण्याचा प्रयत्न केला जातो.

पोलीस ठाण्यात समुपदेशन होईलच, हे खात्रीशीर सांगता येत नाही. काहींना तर असे प्रकार कटकट वाटतात. योग्य प्रकारे समुपदेशन न केल्याने भांडणे मिटण्यापेक्षा ती टोकाला जाण्याचेच
प्रसंग उद्भवतात;

मात्र सातारा तालुका कार्यक्षेत्र असलेल्या समुपदेशक ज्योती जाधव व त्यांच्या सहकारी आरती राजपूत यांनी दाम्पत्यांच्या मनाचा ठाव घेत त्यांची नेमकी समस्या जाणून त्यावरयोग्य समुपदेशन केल्याने आज १४८२ प्रकरणे त्यांनी समझोत्याने मिटवली.ज्योती जाधव यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील येडेमच्छिंद्र गावी शेतकरी कुटुंबात झाला. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचे शिक्षण त्यांच्या आजोळी झाले.

बीएससी इन केमिकल सायकोलॉजीतून शिक्षण झाल्यानंतर नागठाणे येथील राजेंद्र जाधव यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. सामाजिक काम करण्याची आवड असल्याने त्यांनी पुणे येथून एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेतले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची महिला व बालकल्याण विभागाच्या समुपदेशकपदी निवड झाली. गेल्या आठ वर्षांपासून ज्योती जाधव सातारा तालुका ठाण्यातील समुपदेशन केंद्र्रातून हे कर्तव्य अविरतपणे बजावत आहेत.

सप्टेंबर २०१० ते सप्टेंबर २०१८ पर्यंत त्यांच्याकडे एकूण १५७० प्रकरणे नोंद झाली आहेत. त्यापैकी ज्योती जाधव, आरती राजपूत यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने १,४८२ प्रकरणे मिटवली आहेत. तसेच तडजोड न झाल्याने ६८ दाखल केसेस न्यायालयात सुरू असून, त्यापैकी ३९ प्रकरणे निकाली निघाले आहेत.
पती-पत्नीच्या संसारामध्ये काही संशय आणि गैरसमजातून दुरावा निर्माण होत असतो. त्यांच्या मनातील मळवाटा दूर करत त्यांच्या संसाराची गाडी समुपदेशनातून पुन्हा रुळावर आणत त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम सातारा तालुका पोलीस ठाण्यातील समुपदेशक करीत आहेत. याकामी त्यांना पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचेही सहकार्य मिळत असते.

दोन वर्षांपूर्वी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एक सुशिक्षित महिला पती आणि सासू-सासºयांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आली होती. त्यावेळी तत्कालीन पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी त्या संबंधित महिलेला समुपदेशनासाठी केंद्रात पाठविले. तिची समस्या ऐकून घेतल्यानंतर ती महिला म्हणाली, ‘कुटुंबासाठी मी खूप कष्ट करत असते; मात्र पती व सासू-सासºयांना माझी काहीच किंमत नाही. त्यामुळे आमची भांडणे होत
असतात. त्याला वैतागल्यामुळे मला त्यांच्यासोबत संसार करायचा नाही.’ संबंधिताच्या पतीशी चर्चा केल्यानंतर समजले की ती महिला खूप कष्ट करत असते; मात्र प्रत्येक गोष्ट बोलून दाखवते, त्यामुळे तिचा राग येतो. त्यानंतर दोघांचे समुपदेशन केल्यानंतर संसार तोडण्यासाठी तयार झालेले पती-पत्नी एकत्र आले. आज त्या दोघांचा संसार सुखात सुरू आहे. या समुपदेशन केंद्रामुळे असे हजारो संसार सावरले आहेत.
- ९८५०३३२५४८

मार्गदर्शन करून कुटुंब एकत्र टिकविण्यासाठी प्रयत्न...
कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र्रामध्ये मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, आयटी विभागातील समस्याग्रस्त स्त्री-पुरुषांच्या केसमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सुरुवातीला पतीने मारहाण केली. व्यसनाधीनता, घरातून बाहेर काढणे, असे प्रश्न घेऊन महिला येत होत्या; परंतु सद्य:स्थिती बदलली आहे. संशय, अनैतिक संबंध, मालमत्ता, विवाहाच्या वेळी होणारी फसवणूक, पत्नीच्या पगाराच्या पैशावर हक्क, जबरदस्ती करणे, नोकरीच्या ठिकाणी होणारी फसवणूक अशा स्वरुपाच्या समस्या येत आहेत. कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र्रांमार्फत शक्यतो कुटुंब एकत्र टिकविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जातात. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांमध्येही वाढ होत असून मालमत्ता, जबाबदारी नाकारणे, धमकी देणे, आरोग्याचे प्रश्न या समस्या जाणवत आहेत. यावेळी कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र्रांमार्फत त्यांच्या मुलांना बोलावून त्यांचे समुपदेशन केले जाते.


 

सोशल मीडियाच्या वापराने अनेक दाम्पत्यांत वादाचे प्रसंग उद्भवतात. किरकोळ कारणांचा वाद डोक्यात घेऊन कुरबुरी करण्यापेक्षा संवादातून कुरबुरी संपवल्या पाहिजेत. वाद किरकोळ असतात; मात्र त्यावर संवादातूनच मार्ग निघू शकतो.
-ज्योती जाधव, समुपदेशक, सातारा तालुका पोलीस ठाणे
 

Web Title: Hundreds of thousands of people flouting Jyoti ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.