शेकडो टन कचरा झाला हद्दपार!
By admin | Published: February 9, 2015 09:14 PM2015-02-09T21:14:53+5:302015-02-10T00:27:09+5:30
जिल्हाभर स्वच्छता : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम
सातारा : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग) च्या वतीने सातारा जिल्ह्यातील पाच मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या गावामध्ये दि. १ फेब्रुवारी रोजी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून हे अभियान राबविण्यात आले. शेकडो सदस्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत गावातील कानाकोपऱ्यातील शेकडो टन कचरा गोळा केला. श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून सशक्त समाजमन घडविण्याबरोबरच संत विचारांतून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करून सामाजिक एकता अखंडित राखण्याचे कार्य गत सात दशकांपासून धर्माधिकारी परिवार करत आहे. याच कार्याची दखल घेत केंद्र शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानासाठी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची स्वच्छता दूत म्हणून निवड केली आहे. गत पाच महिन्यांपूर्वीच धर्माधिकारी प्रतिष्ठानने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सर्वात मोठे स्वच्छता अभियान राबविले होते. यामध्ये लाखो ‘श्री सदस्य’ सहभागी झाले होते. रविवार, दि. १ रोजी जिल्ह्यातील अतीत (ता. सातारा), भुर्इंज (ता. वाई), सातारारोड (ता. कोरेगाव), वत्सलानगर (ता. कराड), मारुल हवेली (ता. पाटण) या गावांमध्ये सकाळी ७.३० वाजता शेकडो श्री सदस्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत अभियानाचा प्रारंभ झाला. वडूज शहरात ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता मोहीम झाली. यावेळी बाजारसमितीचे सभापती अशोकराव गोडसे, प्रा. बंडा गोडसे, तहसीलदार विवेक साळुंके, गटविकास अधिकारी राहुल देसाई यांची उपस्थिती होती.
सदस्यांनी गावातील प्रमुख मार्गांसह ठिकठिकाणचा शेकडो टन कचरा गोळा केला. अभियानासाठी झाडू, फावडे, घमेली, खोरे आदी वस्तू सदस्यांनी स्वत: आणल्या होत्या. ग्रामपंचायतीने कचरा गोळा करण्यासाठी वाहनांची सोय केली होती. तसेच रविवार, दि. ८ रोजी सायगाव (ता. जावळी), बावधन (ता. वाई), पुसेगाव (ता. खटाव), कोळे (ता. कराड), चरेगाव (ता. कराड) व तारळे (ता. पाटण) येथे हे अभियान राबविण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
शिरवळमध्ये स्वच्छता मोहीम
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ याठिकाणी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने शिरवळमधील मेनरोड, एस. टी. स्टँड परिसर, शिवाजी चौक, न्यू कॉलनी, शिवाजी कॉलनी, बाजारपेठ, केदारेश्वर कॉलनी, शिर्के कॉलनी, पळशी रोड, तांबेनगर, जय भवानीनगर आदी विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शिरवळ ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागानेही सहकार्य केले.