पिंपरी फाटा येथे शेकडो टन लाकडांचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 07:12 PM2020-02-15T19:12:04+5:302020-02-15T19:13:48+5:30
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-औंध रस्त्यावरील पिंपरी फाटा येथील रिकाम्या जागेत लाखो रुपये किमतीचा शेकडो टन लाकडांचा साठा पडून आहे. बाभळ, वड आदी विविध प्रकारच्या झाडाची मोठी लाकडे अस्ताव्यस्त पडून आहेत.
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-औंध रस्त्यावरील पिंपरी फाटा येथील रिकाम्या जागेत लाखो रुपये किमतीचा शेकडो टन लाकडांचा साठा पडून आहे. बाभळ, वड आदी विविध प्रकारच्या झाडाची मोठी लाकडे अस्ताव्यस्त पडून आहेत.
पिंपरी फाटा येथील सुमारे दिड एकर क्षेत्रातील रिकाम्या जागेत बहुमोल किंमतीच्या विविध प्रकारच्या झाडांच्या लाकडांचा साठा करण्यात आला आहे. सध्याच्या बाजारभावानुसार वेगवेगळ्या झाडांच्या लाकडांना वेगवेगळा दर आहे.
अगदी अडीच हजार रुपये टनापासून सहा-साडेसहा हजार रुपये टनांपर्यंत लाकडांची वर्गवारी करण्यात येते. या बाजारभावानुसार या ठिकाणी असलेल्या लाकडांचा साठा पाहता लाखो रुपयांचा हा साठा असल्याचे स्पष्ट होते. वनविभागाच्या कायद्याप्रमाणे झाडे तोडणे, वाहतूक करणे व त्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा करण्यासाठी वनविभागाच्या परवान्याची निश्चितपणे गरज असते.
हा लाकडाचा साठा कुणाचा असून त्यांनी साठा करण्याची परवानगी घेतली आहे का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केले जात आहेत. शासनाच्या हद्दीतील विना परवाना झाड तोडले तर त्याच्यावर तात्काळ वनविभागाच्यावतीने कडक कारवाई होते. मग लाखो रुपयांचा लाकडाचा साठा रस्त्याच्याकडेला पडून असताना नेमके याकडे दुर्लक्ष का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
विनापरवाना साठ्यावर कारवाई होणार
पिंपरी फाटा येथील रिकाम्या जागेत लाकडांचा साठा करण्यास कोणीही वनविभागाची परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे किती टन लाकडाचा साठा आहे याची पाहणी करून विनापरवाना लाकडांचा साठा करणारावर निश्चितपणे वनविभागाच्या कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती रहिमतपूरचे वनपाल संदीप जोशी यांनी दिली.