शेकडो वृक्षांची कत्तल करून ‘अग्निसंस्कार’
By Admin | Published: February 1, 2015 10:41 PM2015-02-01T22:41:25+5:302015-02-02T00:03:50+5:30
मांघर येथील घटना : धनिकांच्या बंगल्यांसाठी ‘ईएसझेड’मध्ये पुन्हा वृक्षतोड
महाबळेश्वर : परिसरातील शिंदोळा, मेटतळे, भेकवली, हरोशी या गावांतील विनापरवाना वृक्षतोडीच्या घटना ताज्या असतानाच आता मांघर येथेही धनिकांच्या बंगल्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून पुरावा नष्ट करण्यासाठी ते पेटवून दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सुमारे आठवडाभर ही वृक्षतोड सुरू होती; परंतु तलाठी व ग्रामसेवकाने गांधारीची भूमिका घेतल्याने ती पूर्ण होऊ शकली. या वृक्षतोडीमुळे महाबळेश्वरात संतापाची लाट उसळली असून, वृक्षसंहार करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.केंद्र शासनाने महाबळेश्वर हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) म्हणून जाहीर केले आहे. असे असूनही वारंवार मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीच्या घटना उघडकीस येत आहेत. वृक्षसंहार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याऐवजी प्रशासन गांधारीची भूमिका घेताना दिसत आहे. या भूमिकेमुळे वृक्षतोडीला एकप्रकारे प्रोत्साहन मिळत आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून, त्यातील मांघरचा प्रकार रविवारी उघडकीस आला.
महाबळेश्वरपासून सात किलोमीटर अंतरावर मांघर गावातील गट क्र. १९ चा १ व फॉरेस्ट कम्पार्टमेंट ९२ लगत सुमारे २५ गुंठे क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे. ही मिळकत विकण्याचा मालकाचा विचार आहे. ही मिळकत एक स्थानिक राजकीय पुढारी घेणार असल्याची चर्चा आहे. या मिळकतीत जांभूळ, गेळा, भौमा, अंजन, हिरडा आदी वनौषधी व दुर्मिळ वृक्ष होते. त्यापैकी ९० टक्के वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. काही वृक्ष आजही या मिळकतीत शेवटची घटका मोजत आहेत. वृक्षांची कत्तल करून ते जाळण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे झाडांची खोडेही जळाली आहेत. संबंधिताने वृक्ष तोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी सुमारे दीडशे ते दोनशे वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज रविवार असल्याने कोणत्याही खात्याकडून या प्रकाराची दखल घेतली गेलेली नाही.
भेकवली येथील वृक्षतोड ज्या तलाठ्याच्या कार्यक्षेत्रात झाली, त्याच तलाठ्याच्या क्षेत्रात हा भाग येत असल्याने या तलाठ्याच्या भूमिकेविषयी शहरातून शंका व्यक्त केली जात आहे. या तलाठ्यावर खातेअंतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महाबळेश्वर व परिसरात होत असलेल्या विनापरवाना वृक्षतोडीकडे आमदार मकरंद पाटील यांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांचे लक्ष वेधले होते. याच बैठकीत पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. या बैठकीला आठ दिवस उलटत नाहीत तोच मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीचा प्रकार समोर आल्याने पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
बंगलेही उभे राहिले
डोंगरउतारावर असलेल्या या जागेच्या लगत अशाच प्रकारे वृक्षतोड करून व मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून बंगले बांधण्याचे काम सुरू आहे. हे बंगले पुण्यातील व्यक्तींचे असल्याचे गावकरी सांगतात. दरम्यान, या बांधकामावर महसूल खात्याने कारवाई सुरू केली असल्याचेही वृत्त आहे. परंतु या ठिकाणी झालेली वृक्षतोड आणि उत्खननावर कारवाई होणार का, हे मात्र समजू शकले नाही. या बंगल्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.