‘वॉटर कप’मधील सहभागी गावांना दीड कोटी: शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:08 PM2019-05-12T23:08:07+5:302019-05-12T23:08:12+5:30
दहिवडी : ‘माण, खटाव तालुक्यांतील असंख्य गावं दुष्काळाचा सामना करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाली आहेत. त्यांना पाठबळ देण्यासाठी ...
दहिवडी : ‘माण, खटाव तालुक्यांतील असंख्य गावं दुष्काळाचा सामना करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाली आहेत. त्यांना पाठबळ देण्यासाठी डिझेलसाठी खर्च म्हणून खासदार निधीतून दीड कोटी रुपये लवकर देण्यात येईल,’ अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली.
खासदार शरद पवार रविवारी दुष्काळी माण तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता शिंदी खुर्द येथे सुरू असलेल्या कामाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, रोहित पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, उद्योग मंत्रालयाचे सचिव डॉ. नामदेव भोसले, प्रवीण इंगवले, तेजस शिंदे, कविता म्हेत्रे, शिवाजी सर्वगौड, संदीप मांडवे उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘निसर्गाची अवकृपा असल्याने दुष्काळ पाचवीला पुजला आहे. सरकार सरकारची जबाबदारी पार पाडतंय; पण ग्रामस्थ म्हणून तुम्हीही जबाबदारीने काम करताय. सकाळी लवकर उठून काम करता. बाहेरगावी नोकरीला असणारी मंडळी शनिवार, रविवारी गावाकडे येतात. एवढी जिद्द, चिकाटी महाराष्ट्रात कमी ठिकाणी पाहायला मिळते. काम झाल्यानंतर कोणीतरी नाष्टा देतो. कष्टकऱ्यांना दोन घास घालता हे दातृत्व दाखवताय त्यांचे मनापासून कौतुक
आहे.’
पवार म्हणाले, ‘हे कष्ट वाया जाणार नाही. पुढच्या पिढीसाठी केलेले योगदान चांगले आहे. कसंबसं पाणी मिळतंय. जनावरांनाही मिळावं म्हणून आपण सरकारशी बोलणार आहे. खासदार निधीतून दीड कोटी डिझेलसाठी आठ ते दहा दिवसांत पैसे पोहोचतील.’
प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘या तालुक्यात सगळे लोक श्रमदान करत आहेत. कामानिमित्त बाहेर असणारी मंडळी, माहेरवाशीण, जावई काम करत आहेत. वॉटर कप स्पर्धेत तालुक्याचा सातत्याने नंबर येतो ही परंपरा यंदाही कायम ठेवू.’
संजीवराजे म्हणाले, ‘जिल्हा परिषदेने कायम मदतीचा हात दिला आहे. बंधारा दुरुस्ती, गाळ काढणीची कामे असल्यास तातडीने तोडगा काढला जाईल.’
गावांसाठी तीस टँकर
‘माण, खटाव तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी रोहित पवार यांच्यातर्फे तीस टँकर पुरवण्यात येणार आहेत. हे टँकर पावसाळा सुरू होईपर्यंत मागणी होईल, त्या गावांना मोफत पाणीपुरवठा करतील,’ अशी माहितीही शरद पवार यांनी दिली.