भुकेल्या पोटाला मिळतोय हक्काचा घास ! साताऱ्यातील सर्व धर्मीयांचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 05:19 PM2020-05-11T17:19:41+5:302020-05-11T17:21:26+5:30
अनेक युवक आणि काही ज्येष्ठ मंडळी एकत्र येत आहेत. तसेच ते स्वखर्चातून व मिळालेल्या मदतीतून चांगला उपक्रम राबवत आहेत. गेल्या ४६ दिवसांपासून सर्वजण दररोज अन्नाची ४५० ते ५०० पाकिटे तयार करून वाटप करत आहेत.
नितीन काळेल
सातारा : उपेक्षित, गरीब, आजारी व्यक्ती, वृद्ध, दिव्यांग बांधवांसाठी साताºयातील सर्व धर्मीय नागरिकांचे काम सुरू आहे. याअंतर्गत गेल्या ४६ दिवसांपासून दररोज सुमारे ४५० अन्न पाकिटांचे वाटप जागेवर जाऊन करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास २० हजार पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे भुकेल्या पोटाला हक्काचा घास मिळत आहे.
कोरोना विषाणूमुळे जिल्ह्यात संचारबंदी आहे. यामुळे अनेक व्यवसायांवर, मजुरी करणाऱ्यांवर गंडांतर आलेले आहे. अशामधील गरीब, गरजू, वंचित, वृद्ध, दिव्यांगांना मदत करण्याचे काम अनेकांकडून सुरू आहे. अशाचप्रकारे साता-यामधील गुरुवार पेठेतील दिवंगत अॅड. अख्तरनवाज रंगलाल कलाल यांच्या निवासस्थानी अनेक युवक आणि काही ज्येष्ठ मंडळी एकत्र येत आहेत. तसेच ते स्वखर्चातून व मिळालेल्या मदतीतून चांगला उपक्रम राबवत आहेत. गेल्या ४६ दिवसांपासून सर्वजण दररोज अन्नाची ४५० ते ५०० पाकिटे तयार करून वाटप करत आहेत.
विशेष म्हणजे गरजू, आजारी, निराधार व्यक्ती आहेत तेथे जाऊन पाकिटे देण्यात येतात. त्यासाठी स्वतंत्रपणे अनेकजण जातात. सर्वांनीच हे काम वाटून घेतले आहे. त्यासाठी पदरमोड ही करतात.
विशेष म्हणजे या ग्रुपकडून शासनाच्या सर्व अटी, नियम, स्वच्छतेचे पालन करून ही सेवा बजावली जात आहे. कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत ही अन्नदानाची सेवा आम्ही सुरूच ठेवणार आहोत. तसेच येईल त्या संकटांशी सामना करीत आम्ही यातून मार्ग काढणार, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
यामध्ये मुफ्ती अब्दुल हमीद, आफताब कलाल, साहिल बागवान, सिद्धार्थ गुजर, सलीम बागवान, रोहित लाहोटी, नगरसेवक अल्लाउद्दीन शेख, मोहसीन कलाल, भाऊ राजमाने, अॅड. रमिज कलाल, मन्सूर शेख, इन्नुस खान, इर्षाद बागवान, तौफिक बागवान, नादीर पालकर यांच्यासह गुरुवार पेठतील नागरिक एकत्र येऊन हा अत्यंत स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवत आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्यापासून आम्ही गरीब, गरजू आणि दिव्यांगांना अन्न पाकीटचे वाटप करत आहोत. यापुढेही सामाजिक भावनेतून अन्नदानाचे काम सुरूच राहणार आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते यासाठी मदत करत आहेत. तसेच प्रशासनास लागेल तेव्हा मदत करण्यास आम्ही तयार आहोत.
- आफताब कलाल, सातारा
.