राष्ट्रवादी वगळता इतरांना उमेदवाराची शोधाशोध

By admin | Published: October 7, 2016 09:55 PM2016-10-07T21:55:11+5:302016-10-07T23:58:52+5:30

आरक्षणामुळे अनेक दिग्गजांना हादरा : नगरपालिकेसाठी अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव

Hunt for Candidate Others except Nationalist | राष्ट्रवादी वगळता इतरांना उमेदवाराची शोधाशोध

राष्ट्रवादी वगळता इतरांना उमेदवाराची शोधाशोध

Next

पांडुरंग भिलारे -- वाई -पाण्यात देव बुडवून बसलेल्या वाईतील दिग्गजांना वाई नगरपालिकेसाठी पडलेल्या अनुसूचित जाती महिला राखीव या आरक्षणामुळे घरी बसावे लागून त्यांची दांडी गुल झाली आहे. त्यांना नगरसेवक पदाची निवडणूक लढवावी लागणार आहे. नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाल्याने राष्ट्रवादीकडून विद्यमान नगरसेविका मनीषा जावळे, शोभा रोकडे व माजी नगरसेवक संदीप जावळे यांच्या पत्नीला संधी मिळू शकते. काँग्रेसकडे सध्या उमेदवार दिसत नाही त्यांना उमेदवाराची शोधाशोध करावी लागणार आहे. शिवसेना-भाजपची युती होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यांच्याकडेही योग्य उमेदवार असला तरी त्यांनी अधिकृतरीत्या जाहीर केला नाही. आरपीआयकडे तीन उमेदवार आहेत. परंतु ते राज्यात महायुतीत असल्याने ते काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण वाई शहराचे लक्ष लागून राहणार आहे.
वॉर्ड रचनेनंतर नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे वाईकरांचे लक्ष लागून राहिले होते. चार प्रभागांचे लोकसंख्येनुसार वीस वॉर्ड करण्यात आले. त्यापैकी दहा वॉर्ड महिलांसाठी राखीव आहेत. प्रत्येक वॉर्डची रचना बदलल्याने आजी-माजी नगरसेवकांची गोची झाली. हक्काचे मतदान दुसऱ्या वॉर्डमध्ये गेल्याने विजयाचे गणित कसे जुळवायचे याची चिंता वाढल्याने नगराध्यक्षपदाचे आरक्षण काय पडतंय यावर पुढची भूमिका घेऊ अशाच पावित्र्यात आजी-माजी नगरसेवक होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नगराध्यक्ष पदाचे आरक्षण काय पडतंय याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. विद्यमान नगरसेवक भूषण गायकवाड, नंदकुमार खामकर, सचिन फरांदे, अनिल सावंत, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष काशिनाथ शेलार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अनिल शेंडे हे उत्सुक होते. नगराध्यक्षपद अनुसूचित जाती पुरुषांसाठी राखीव झाल्यास नगरसेवक सुभाष रोकडे, माजी नगरसेवक संदीप जावळे, माजी नगराध्यक्ष जनार्दन वैराटही इच्छुक होते. मात्र, नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाल्याने सर्व दिग्गजांचा भ्रमनिरास झाला.
आमदारकीमुळे आमदार मकरंद पाटील यांना पालिकेवर हवा तसा वचक ठेवता आला नाही. त्यामुळे आघाडी अंतर्गत गटातटाच्या राजकारणाने वाई विकास कोसो दूर राहिला. वाईतील विकासकामे सुरू करण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले परंतु ती आघाडीतील दुहीमुळे पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे गेली दहा वर्षे पालिकेत सत्ता असताना राष्ट्रवादीवर वाई जनता कमालीची नाराज आहे. टक्केवारीचे ग्रहण लागल्याने नवीन अग्निशमन बंब खरेदी केले नाहीत. राष्ट्रवादीच्या काळतच पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पालिकेवर टाळे ठोकण्याची नामुश्की ओढवली आहे. याचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे. पालिकेची निवडणूक ही नेहमीच आमदार मकरंद पाटील विरुद्ध मदन भोसले यांच्या गटात लढली गेली आहे. परंतु यावेळी पालिका निवडणुकीचे चित्र वेगळे असणार आहे. यावेळी शिवसेना-भाजप हे पूर्ण ताकदीनिशी लढणार आहेत. तसेच दोन्ही आघाड्यांवर नाराज गट आपला वेगळा सुभा मांडण्याची शक्यता आहे. मनसेची भूमिका गुलदस्त्यातच आहे. रिपाइं आघाडी धर्म पाळणार की, वेगळी भूमिका घेणार हे लवकर कळेल.
नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाल्याने शोभा रोकडे यांचे नाव पुढे येण्याची दाट शक्यता आहे. नगरसेविका मनीषा जावळे व माजी नगरसेवक संदीप जावळे यांची पत्नी शुभांगी यांनाही राष्ट्रवादीकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. ‘रिपाइं’कडे असणाऱ्या माजी नगरसेविका रेखाताई कांबळे काँग्रेसमधून मागे निवडून आल्या होत्या. मंदा कांबळे व अन्य दोन महिला उमेदवार निवडणुकीच्या तयारीत आहेत.


तीर्थक्षेत्र आघाडीची दहा वर्षे अबाधित सत्ता
गेल्या दहा वर्षांत पालिकेवर राष्ट्रवादी पुरस्कृत तीर्थक्षेत्र आघाडीची सत्ता आहे. आमदार मकरंद पाटील यांचा जनसंपर्क व राजकीय मुसद्दीपणा यामुळे दोन्ही पंचवार्षिक निवडणुकीत सत्तेपर्यंत पोहोचण्यात काही कार्यकर्त्यांच्या गटतटाच्या राजकारणामुळे अपयश आले. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अपक्ष खरात दाम्पत्य तीर्थक्षेत्रमधून जनकल्याण आघाडीत प्रवेश केल्याने काँग्रेसला अवघी सहा महिने सत्ता उपभोगता आली. माजी आमदार मदन भोसले यांनी वाईकरांशी कसलाच जनसंपर्क न ठेवल्याने त्यांची जनकल्याण आघाडी बिना नावाड्याची बोट अशी झाली होती. गेल्या दहा वर्षांत सभागृहात त्यांच्या आरोपात कितीही तथ्य असले तरी सत्ताधाऱ्यांची त्यांना कधीही कोंडी करता आली नाही. नंदकुमार खामकर सभागृहात कधीतरी उपस्थित असल्याने पाच वेळा नगरसेवक होऊन सुद्धा विशेष प्रभाव पाडू शकले नाहीत. सचिन फरांदे हे एकटेच व्यक्ती सत्ताधाऱ्यांना घाम फोडत होती. परंतु त्यांना अन्य सहकाऱ्यांची साथ न मिळाल्याने ते कोणताही प्रश्न सभागृहात उपस्थित करूनही ते तडीस नेऊ शकले नाहीत.

Web Title: Hunt for Candidate Others except Nationalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.