महाबळेश्वरात हुर्रर... कोरेगावात भुर्रऽऽर !
By admin | Published: July 15, 2017 01:07 PM2017-07-15T13:07:58+5:302017-07-15T13:07:58+5:30
पावसाचा लपंडाव : बळीराजाच्या नजरा आभाळाकडे
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. १५ :विश्रांतीनंतर मान्सून जिल्ह्यात पुन्हा सक्रिय झाला असून अतिपर्जन्यवृष्टीच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू आहे. पश्चिमेकडे पावसाने हजेरी लावली असताना पूर्वेकडे मात्र अद्यापही मान्सूनने पाठ फिरवली आहे. आजपर्यंत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर तर सर्वात कमी कोरेगाव तालुक्यात झाला आहे.
महाबळेश्वर हे पावसाचे आगार म्हणून ओळखले जाते. आजपर्यंत याठिकाणी सर्वाधिक १ हजार ६९७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. महाबळेश्वर खालोखाल जावळी, पाटण तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र, पूर्वेकडील माण, खटाव फलटण अन् कोरेगाव तालुका मात्र अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यात १ जून पासून आजपर्यंत सर्वात कमी ९० मिलीमीटर पाऊस कोरेगाव तालुक्यात झाला आहे.
कोरेगाव, खटाव तालुक्यात दोन दिवसांमध्ये पावसाचा शिडकावा पडला. मात्र, खरीप पिकांसाठी अजुुनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. पाऊस लांबत चालल्याने दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे.
२४ तासात २३१ मिलीमीटर पाऊस
सातारा जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर व शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासात तब्बल २३१.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ३ हजार ८४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी ३४९.७ मिलीमीटर आहे. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे (कंसात एकूण पाऊस) : सातारा २०.५ (२६७.८), जावळी ३३.९ (५१२), पाटण २९.२ (३६८.८), कऱ्हाड १४.९ (११०.३), कोरेगाव ४.१ (९०.१), खटाव ३.८ (१६०.७), माण शून्य (१७९.९), फलटण शून्य (१०६.८), खंडाळा ४.७ (१३९.०), वाई १३.५ (२१२.४), महाबळेश्वर १०६.७ (१६९७.९)