‘तौउते’ चक्रीवादळाने पेरणीपूर्व मशागतींना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:41 AM2021-05-20T04:41:26+5:302021-05-20T04:41:26+5:30

वरकुटे-मलवडी : चार दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसाने सर्वांचीच धांदल उडाली आहे. माण पूर्व भागात पेरणीपूर्व मशागतींची लगबग सुरू ...

Hurricane 'Tauute' breaks pre-sowing tillage | ‘तौउते’ चक्रीवादळाने पेरणीपूर्व मशागतींना ब्रेक

‘तौउते’ चक्रीवादळाने पेरणीपूर्व मशागतींना ब्रेक

Next

वरकुटे-मलवडी : चार दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसाने सर्वांचीच धांदल उडाली आहे. माण पूर्व भागात पेरणीपूर्व मशागतींची लगबग सुरू असतानाच आलेल्या अवकाळी पावसाने शेतीची कामे खोळंबली आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर मशागती सुरू होऊन नंतर पेरणी केली जाणार असल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडणार आहेत.

शेतकऱ्यांनी बियाणे व खतांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली असून, कोरोनातील लॉकडाऊनमुळे शेतीच्या कामात अडथळे निर्माण होताना दिसत आहेत.

मे महिना संपत आल्याने शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीचे वेध लागले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागती करण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शिवारात शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली होती. मात्र, अरबी समुद्रात सुरू झालेल्या ‘तौउते’ चक्रीवादळामुळे वातावरण दूषित झाल्याने पेरणीपूर्व मशागतींना ब्रेक लागला आहे.

चक्रीवादळामुळे सर्वत्र पाऊस सुरू आहे. वातावरणात गारवा पसरला असून, शेतीची कामेही खोळंबली आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला नांगरट, रोटरची कामे झाली असली तरी सध्या पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतातील घाण काढणे, कुळवणी, सरी पाडण्याचे काम शेतकऱ्यांनी सुरू केले होते. मात्र, पावसामुळे ही कामे थांबली आहेत. मशागतींच्या कामासोबतच शेतकऱ्यांनी बियाणे व खतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. कोरोनामुळे बाजारपेठांत निर्बंध आहेत. मात्र, शेतीच्या कामासाठी शासनाने मुभा दिली आहे. त्यामुळे शेती संबंधित दुकाने सुरू असल्याने, शेतकरी दुकानांवर गर्दी करीत आहेत.

कोरोना व लॉकडाऊनची स्थिती असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. शेतीची कामे कशी पूर्ण करायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. कोरोनामुळे मजूर मिळण्याची पंचाईत झाली असून, बी-बियाणांचाही तुटवडा पडण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने खरिपाच्या पेरण्यांसंदर्भात योग्य नियोजन केले असले तरीपण त्याची अंमलबजावणी कितपत होते हे महत्त्वाचे ठरणार आहे. योग्य पद्धतीने नियोजन न झाल्यास आधीच कोरोना, लॉकडाऊन त्यातच खरीप वाया गेले, तर शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागेल याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तालुक्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

(चौकट)

माण तालुक्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धूळवाफ पेरण्या केल्या जातात. मात्र, अवकाळी पावसानंतर थोड्याच कालावधीत वादळी पावसाने सुरुवात केल्याने येथील शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागती थांबल्या आहेत. त्यातच वादळी पावसाला धरूनच मान्सून सुरू झाल्यास येथील पेरण्यांची परिस्थिती अवघड होणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. एकूणच शेतकरी व कृषी विभागापुढे खरीप वाचविण्याचे मोठे संकट उभे आहे. सुरू असलेला वादळी पाऊस कितपत पडतोय आणि पेरणी होईल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी निसर्गाच्या अवकाळीपणासमोर शेतकरी प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

फोटो :

Web Title: Hurricane 'Tauute' breaks pre-sowing tillage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.