ठराव जमा करण्यासाठी सहकार विभागात धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:59 AM2021-02-23T04:59:14+5:302021-02-23T04:59:14+5:30
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव दाखल करण्यासाठी सोमवारी तालुक्यातील उपनिबंधक कार्यालयांमध्ये लोकांची धांदल उडाली होती. निवडणुकीच्या अनुषंगाने ...
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव दाखल करण्यासाठी सोमवारी तालुक्यातील उपनिबंधक कार्यालयांमध्ये लोकांची धांदल उडाली होती.
निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या वर्षभरापासून सहकारी संस्थांचे ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू होती. कोरोनामुळे या प्रक्रियेला मधल्या काळात ब्रेक लागला होता. सहकार विभागाने या निवडणुकीला दोनदा मुदतवाढ दिली होती. त्यानंतर २२ फेब्रुवारीपर्यंत ठराव दाखल करुन देण्यास मुदत देण्यात आली होती.
जिल्ह्यातील विकास सेवा सोसायट्या, पतसंस्था, बँका, मजूर सोसायट्या, बाजार समित्या, खरेदी विक्री संघ, गृहनिर्माण संस्था, कृषी उत्पादन, फळ प्रक्रिया आदी संस्थांमधून ठराव घेतले जातात. या सोसायट्यांमधून एकूण संचालकांपैकी एका संचालकाला मतदानाचा अधिकार सर्वानुमते दिला जातो. यासाठी सभा घेऊन ठराव केले जातात. हे ठराव तालुका उपनिबंधक कार्यालयाकडे जमा केले जातात. तिथून ते जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये एकत्रित करुन ते जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाठविले जातात.
जिल्हा बँकेचे जिल्ह्यातील २६३० मतदार आहेत. यापैकी १५८३ ठराव यापूर्वी जमा झालेले होते. तालुका उपनिबंधक कार्यालयांमध्ये जमा झालेल्या ठरावांची यादी करण्याचे काम सोमवारी सुरू होते. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सर्व ठराव जमा करुन घेण्यात आले. हे ठराव मंगळवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त होतील, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनी दिली.
ठरावांबाबत उत्सुकता
जिल्ह्यातील संस्थांनी बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव करुन दिले आहेत. जिल्हा बँकेवर प्रामुख्याने आमदार, खासदार हे संचालक आहेत. निवडणुकीसाठी झालेल्या ठरावांवर त्यांचाच वरचष्मा होता. आगामी काळात हीच मंडळी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
जिल्हा बँकेचा फोटो वापरावा