Satara: लाडकी बहीण फसवणूकप्रकरणी पती-पत्नीस पोलिस कोठडी, आधार कार्ड सर्च करून दाखल केले होते ३० अर्ज

By दीपक शिंदे | Published: September 4, 2024 07:01 PM2024-09-04T19:01:37+5:302024-09-04T19:05:23+5:30

योजनेपेक्षा अधिक पैसे मिळविण्यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर

Husband and wife in police custody in case of cheating on Ladki Bahin Yojana in Satara | Satara: लाडकी बहीण फसवणूकप्रकरणी पती-पत्नीस पोलिस कोठडी, आधार कार्ड सर्च करून दाखल केले होते ३० अर्ज

Satara: लाडकी बहीण फसवणूकप्रकरणी पती-पत्नीस पोलिस कोठडी, आधार कार्ड सर्च करून दाखल केले होते ३० अर्ज

वडूज : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेऊन, योजनेला गालबोट लावण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्याच सातारा जिल्ह्यातील निमसोड येथील दांम्पत्याने केले आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून, या प्रकाराची आता चौकशी सुरू आहे. प्रतीक्षा जाधव आणि तिचा पती गणेश घाडगे या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता ६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

विविध आधार कार्डांचा वापर व विविध पेहराव करून एकच बँक खाते क्रमांक देऊन लाडकी बहीण योजनेचे प्रतीक्षा जाधव हिने पती गणेश घाडगे याच्या मदतीने एकूण ३० अर्ज भरले. त्यातील प्रतीक्षा पोपट जाधव या तिच्या खात्यावर वडूज येथील माणदेशी महिला सहकारी बँकेत पैसेही जमा झाले. अधिक पैसे मिळविण्याच्या उद्देशाने तिने ही फसवणूक केल्याने प्रतीक्षा आणि तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.

गुगलवर आधार कार्ड सर्च करून या दाम्पत्याने हे ३० अर्ज दाखल केले होते. प्रतीक्षा जाधव हिने जेमतेम बारावी शिक्षण झालेला पती गणेश संजय घाडगे याच्या मदतीने शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षाराणी ओंबासे यांनी या दाम्पत्याविरोधात वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून ३३८, ३३६ (३), ३४० (१), ३४० (२), ३१८(४), ३१९ (२), ३१४ व ३ (५) या कलमान्वये प्रतीक्षा पोपट जाधव व तिचा पती गणेश घाडगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

एकूण ३० अर्ज भरले, चार मंजूर

प्रतीक्षा जाधव हिने भरलेल्या ३० अर्जांपैकी प्रतीक्षा पोपट जाधव, मंगल संजय घाडगे, सुनंदा संजय पिसाळ आणि कोमल संजय पिसाळ यांचे अर्ज शासनमान्य झाले आहेत. तर प्रतीक्षा पोपट जाधव या नावाने भरलेले २५ अर्ज तपासणीअंती बनावट निघाले असून अजून प्रतीक्षेचा एक अर्ज मान्यतेच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले.

Web Title: Husband and wife in police custody in case of cheating on Ladki Bahin Yojana in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.