बंगळुरूमध्ये पत्नीचा खून केला, मृतदेह बॅगेत भरून कारने मुंबईच्या दिशेने निघाला; पतीला शिरवळ येथे अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 14:36 IST2025-03-29T14:36:14+5:302025-03-29T14:36:59+5:30
पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

बंगळुरूमध्ये पत्नीचा खून केला, मृतदेह बॅगेत भरून कारने मुंबईच्या दिशेने निघाला; पतीला शिरवळ येथे अटक
शिरवळ (जि. सातारा) : बंगळुरू येथून परत मुंबईला राहण्यासाठी जाऊ या, असे पत्नी वारंवार म्हणत भांडणे करत होती. यातून होणाऱ्या वादातून पत्नीचा चाकूने खून करून मृतदेह बॅगेत भरून कारने मुंबईच्या दिशेने निघालेल्या पतीला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले.
पत्नीच्या खुनानंतर मानसिक तणावाखाली आलेल्या पतीने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. शिरवळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेत बंगळुरू पोलिसांच्या स्वाधीन केले. विष प्राशन केल्याने शिरवळ येथील खासगी रुग्णालयातून पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले.
गौरी राकेश खेडेकर (वय ३२) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर राकेश राजेंद्र खेडेकर (३५, दोघे सध्या रा. बनारगट्टा, तेजस्विनीनगर, बंगळुरु, मूळ रा. जोगेश्वरी, मुंबई), असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे.
राकेश खेडेकर हा मुंबई येथून बंगळुरुला पत्नी गौरी हिच्यासह कामानिमित्त स्थायिक झाला. बुधवार, दि. २६ च्या मध्यरात्री एकच्या सुमारास राकेशकडे गौरी हिने मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. यावरून दोघांमध्ये वादंग झाला. वाद वाढला असता राग अनावर झालेल्या राकेशने पत्नी गौरी हिच्या हातातील चाकू घेत तिच्या मान, गळा, पाठीवर चाकूने वार केले.
यामध्ये गौरीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर राकेशने घरातील मोठ्या बॅगेत गौरीचा मृतदेह भरून गुरुवार, दि. २७ च्या मध्यरात्री बाराच्या दरम्यान घरातील साहित्य सोबत घेऊन कारमधून (एमएच- ०२, जेपी- २८६६) जोगेश्वरी, मुंबई येथे जाण्यासाठी निघाला. वाटेत एका औषधाच्या दुकानातून फिनाईल व झुरळ मारण्याचे विषारी औषध घेतले. तसेच बंगळुरु येथील एका व्यक्तीला फोन करून पत्नी गौरीच्या खुनाबाबत माहिती दिली. संबंधित व्यक्तीने याबाबत बंगळुरु पोलिसांना माहिती दिली.
यावेळी राकेश खेडेकरने खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी हद्दीत महामार्गावर विषारी औषध प्राशन केले. अत्यवस्थ वाटल्याने एका दुचाकीचालकाने त्याला शिरवळ येथील खासगी रुग्णालयात आणले. त्या ठिकाणी शिरवळ पोलिसांना राकेशने खुनाची माहिती दिली.
मृतदेह घेतला पोलिसांनी ताब्यात
राकेश कारने येत असताना त्याने बंगळुरुमध्ये राहत असलेल्या इमारतीतील एका व्यक्तीला फोन करून घटनेची माहिती दिली. संबंधित व्यक्तीने ही माहिती बंगळुरु पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.