Crime News Karad: वहागावात प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून; प्रियकर ताब्यात, महिला पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 06:10 PM2022-06-04T18:10:11+5:302022-06-04T18:11:13+5:30
शेतात भाडेतत्त्वावर जेसीबी बोलावून खड्डा खणून घेतला होता. खड्डा खोदल्यानंतर बरकतचा खून करून त्याचा मृतदेह त्या खड्ड्यात टाकण्यात आला.
कऱ्हाड : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने निर्घृण खून केला. तसेच शेतात जेसीबीने पंधरा फूट खोल खड्डा काढून मृतदेह पुरून टाकला. वहागाव, ता. कऱ्हाड येथे घडलेली ही धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. पोलिसांनी खड्डा खोदून मृतदेह बाहेर काढला असून, रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याची कार्यवाही सुरू होती.
बरकत खुदबुद्दीन पटेल (वय २८, रा. वहागाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. वहागाव येथील बरकत पटेल हा युवक बेपत्ता असल्याची तक्रार चार दिवसांपूर्वी तळबीड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांकडून त्याबाबतचा तपास सुरू होता. दरम्यानच्या कालावधीत बरकतच्या पत्नीचे एका युवकाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुषंगाने पोलिसांनी तपास केला असता हा प्रकार उघडकीस आला.
चार दिवसांपूर्वी खून
बरकतच्या पत्नीचे गावातीलच एका युवकाशी अनैतिक संबंध होते. याबाबतची माहिती बरकतला मिळाली होती. त्यामुळे तो पत्नी व त्या युवकाशी वाद घालत होता. पती आपल्या संबंधात अडसर ठरत असल्यामुळे पत्नी व तिच्या प्रियकराने सुमारे चार दिवसांपूर्वी बरकतचा खून केला.
जेसीबी बोलावून खड्डा खणून घेतला
तत्पूर्वी संबंधित युवकाने आपल्या शेतात भाडेतत्त्वावर जेसीबी बोलावून खड्डा खणून घेतला होता. खड्ड्यामध्ये पाण्याची टाकी बांधायची आहे, असे त्याने जेसीबीच्या ऑपरेटरला सांगितले होते. खड्डा खोदल्यानंतर बरकतचा खून करून त्याचा मृतदेह त्या खड्ड्यात टाकण्यात आला. तसेच थोडीफार माती ओढून तो खड्डा बुजविला.
दुसऱ्या दिवशी पुन्हा जेसीबी बोलावून पाण्याची टाकी बांधण्याचे काम रद्द झाले असल्याचे सांगून त्या युवकाने खड्डा पूर्णपणे बुजवून घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी उशिरा संबंधित खड्डा खोदून त्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
प्रियकर ताब्यात, महिला पसार
पोलिसांनी याप्रकरणी प्रियकराला ताब्यात घेतले आहे. तर महिला पसार झाली आहे. संबंधित महिला दोन दिवसांपासून गावातून पसार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.