हनिमुनला जातानाच पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 11:41 PM2018-06-03T23:41:45+5:302018-06-04T14:12:03+5:30
वाई : पसरणी घाटामध्ये पुण्याच्या युवकाचा झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात वाई पोलिसांना यश आले असून, हा खून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी प्रियकर निखिल सुदाम मळेकर (वय २४, रा. चिखली, निगडी, पुणे) व नवविवाहिता दीक्षा आनंद कांबळे (२४, रा. औंध, पुणे) या दोघांना अटक केली असून पाचजण फरार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वरला फिरायला निघालेल्या एका नवविवाहित दाम्पत्यावर पसरणी घाटात शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी आनंद ज्ञानदेव कांबळे (वय ३२ रा. औंध, पुणे) यांच्यावर कोयत्याने डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली होती.
आनंदने मित्र राजेश बोबडे याच्यासोबत महाबळेश्वरला फिरण्यासाठी जाण्याचे नियोजन केले होते. हे दीक्षाने निखिलला सांगितले. त्यानुसार निखिल एक दिवस अगोदर महाबळेश्वर परिसरात येऊन थांबला होता. शनिवारी सकाळी पुण्याहून आनंद कांबळे व दीक्षा तसेच राजेश बोबडे व त्याची पत्नी कल्याणी असे चौघेजण कारमधून (एमएच १४ जीएक्स ७१७१) महाबळेश्वरला फिरायला निघाले. दरम्यान, दीक्षा मोबाईलद्वारे निखिलच्या संपर्कात होती. त्याने केलेल्या कटाचा भाग म्हणून कार पसरणी घाटात येताच दीक्षाने उलटीचा त्रास झाल्याचे नाटक करून गाडी बाजूला घेण्यास सांगितले. आनंद व दीक्षा गाडीतून उतरून थोडे बाजूला उभे राहिले. यावेळी राजेश व कल्याणी संरक्षक कठड्यावर बसून फोटो काढत होते. यावेळी पाचगणीहून दोन दुचाकींवरून आलेल्या निखिल याने आपल्या मित्रांच्या मदतीने दीक्षाला पकडून ठेवले तर इतर दोघांनी आनंदवर कोयत्याने वार केले. आनंद रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तर दीक्षा किरकोळ जखमी झाली.
चौकशीनंतर खुनाची कबुली
स्थानिक गुन्हे शाखा व वाई पोलिसांनी २४ तासांत खुनाचा उलगडा करून दीक्षा व तिचा प्रियकर निखिल मळेकर या दोघांनाही वाई ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. दीक्षा ओव्हाळ (कांबळे) व निखिल मळेकर यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दीक्षाच्या मनाविरुद्ध लग्न झाल्याने काही दिवसांपूर्वी निखिलच्या मदतीने पती आनंदच्या खुनाचा कट रचला.