पती, पत्नीचं नातं उरलं चिठ्ठीतच..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 10:58 PM2018-04-15T22:58:54+5:302018-04-15T22:58:54+5:30
सातारा/पाचगणी : एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करत दोघेही घरातून बाहेर पडले. आपण लग्न केलं तर कोणीच स्वीकारणार नाही, ही सल दोघांच्याही मनात सलत होती. यातूनच जीवनाचा शेवट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, शेवटची इच्छा म्हणून गळ्यात मंगळसूत्र अन् पती पत्नीचे नाव लावून दोघांनी प्रेमीयुगूल नव्हे तर पती-पत्नीचं नातं चिठ्ठीत लिहून जंगलात वेगवेगळ्या झाडाला समोरासमोर गळफास घेतला.
अविनाश जाधव हा सांगली येथील एका बँकेत नोकरी करत होता. तर तेजश्री नलवडे ही पुण्यात शिक्षण घेत होती. दोघेही पलूस तालुक्यातील दुधोंडी गावचे. गेल्या काही महिन्यांंपासून तेजश्रीच्या लग्नासाठी घरातून चर्चा होत होती. मात्र, तिने आपले प्रेमसंबंध आहेत, याची कोणालाही म्हणे कल्पना दिली नाही. दोन दिवसांपूर्वी ती अचानक घरातून गायब झाली. हे पाहून घरातल्यांना जबर मानसिक धक्का बसला. त्यांनी तत्काळ कुंडल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तेजश्री बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली.
घरातून बाहेर पडल्यानंतर तेजश्री आणि अविनाश रविवारी पहाटे एसटीने महाबळेश्वरमध्ये पोहोचले. या ठिकाणी आल्यानंतर टॅक्सी चालकांनी त्यांना टॅक्सी बाबत विचारणा केली. अविनाश व तेजश्री एका टॅक्सीतून महाबळेश्वर फिरण्यासाठी निघून गेले. लग्न केले तर कोणालाही आपला संसार आवडणार नाही. याची सल त्यांच्या मनात होती. त्यामुळे शेवटची इच्छा म्हणून तेजश्रीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून दोघांनी स्वत:ला पती-पत्नीचा दर्जा दिला.
एवढेच नव्हे तर मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्येही तेजश्रीने अविनाशचे नाव आणि आडनाव आपल्या नावापुढे लावले. घटनास्थळी पोलिसांना या दोघांनी लग्न केल्याचा कुठलाही पुरावा सापडला नाही. आधार कार्ड, कपडे, काही पैसे एवढेच साहित्य पोलिसांना घटनास्थळी आढळून आले.
इकडे पलूसला या दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी दुपारी तीनपर्यंत दोघांचेही नातेवाईक महाबळेश्वरात आले. ‘या दोघांचे प्रेमसंबंध होते, हे आत्ताच आम्हाला समजतंय,’ असा दावा दोघांच्याही नातेवाइकांनी पोलिसांकडे केला. अविनाशच्या पँटच्या खिशामध्ये पोलिसांना
चिठ्ठी सापडली. ही चिठ्ठी नेमकी कोणी लिहिली? हे समोर येण्यासाठी पोलिसांनी दोघांच्याही नातेवाइकांना चिठ्ठी दाखविली.
त्यावेळी चिठ्ठीतील अक्षर हे तेजश्रीचे असल्याचे त्यांनी ओळखले. दरम्यान, या घटनेमुळे महाबळेश्वर तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
असा आहे चिठ्ठीतील मजकूर
मी अविनाश आनंदा जाधव व सौ. तेजश्री अविनाश जाधव. आम्ही आमच्या इच्छेने हा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकलो नसतो म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. तो माझ्याशिवाय दुसºया कोणाचा विचार करू शकला नसता आणि मी त्याच्याशिवाय दुसºया कोणाचा विचार केला नसता. आम्ही खूप प्रयत्न केले; पण आम्ही एकमेकांशिवाय राहिलो नसतो. आमच्यामुळे उगाच दोन व्यक्तींच्या आयुष्याशी नव्हतं खेळायचं. पाहिजे तर आम्ही पळून गेला असतो; पण तुमची इच्छा नसताना, तुमचे आशीर्वाद नसताना तुम्हाला दुखवून आम्ही सुखी राहिलो नसतो. तुमच्या मनाविरुद्ध आम्ही संसार नसता केला. त्यामुळं आम्ही आमचं आयुष्य संपवत आहोत. यास कोणालाही जबाबदार धरू नये. दोन कुटुंबांनी एकमेकांना त्रास देऊ नका. हा आमचा सर्वस्वी निर्णय होता. यातून आपापसात भांडण करू नका. प्लीज रिक्वेस्ट... नाहीतर आमच्या आत्म्याला शांती नाही मिळणार.
तुमचा अविनाश आनंदा जाधव व सौ. तेजश्री अविनाश जाधव
अविनाश होता एकुलता एक
अविनाशला तीन बहिणी असून, तो सर्वात लहान होता. त्याच्या घरची परिस्थिती बेताची असून, शेतीवरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. कुटुंबाला हातभार लागावा, यासाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून तो सांगलीतील एका बॅँकेत लिपिक म्हणून नोकरी करत होता. तर तेजश्री नलावडे ही घरात थोरली होती. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. अविनाश बीकॉम तर तेजश्रीने एमकॉमपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते.
ओढणीच्या साह्याने घेतला गळफास
अविनाश व तेजश्री या दोघांनी झाडाला ओढणीच्या साह्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या झाडाला असले तरी दोघांमध्ये पाच फुटांचेच अंतर होते.
पायाखाली दगड...
ज्या ठिकाणी तेजश्रीने आत्महत्या केली त्या ठिकाणी तेजश्रीच्या पायखाली एक दगड आढळून आला आहे. या दगडावर उभे राहून तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.