जागृती मंडळाने राबविली स्वच्छता मोहीम
By admin | Published: December 3, 2015 09:28 PM2015-12-03T21:28:02+5:302015-12-03T23:49:35+5:30
जागतिक प्रदूषण नियंत्रण दिन : वेंगुर्ले येथील कॅम्प मैदानाची स्वच्छता
वेंगुर्ले : जिल्हा पोलीस कार्यालयातर्फे सागरेश्वर किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, तर दुसरीकडे येथील पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या तालुका क्रीडा केंद्राच्या मैदानावरील दारूच्या रिकाम्या बाटल्या व काचा जागृती क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी गोळा करून स्वच्छता अभियान राबविले. या बाटल्यांमुळे खेळाडूंना मोठा त्रास सहन करावा लागला.
जागतिक प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त येथील जागृती मंडळातर्फे येथील कॅम्प मैदानावर गुरुवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. येथील पालिकेच्या मालकीच्या व वेंगुर्ले तालुका क्रीडा केंद्राच्या ताब्यात असलेल्या पोलीस ठाण्याच्या समोरीलच क्रीडा मैदानावर दारूच्या पार्ट्या होत असतात.
हे दारुडे दारूच्या बाटल्या मैदानावर टाकतात, तसेच काही वेळा हे दारुडे दारूच्या नशेत बाटल्या फोडतात. त्यामुळे खेळाडूंना इजा होते. मात्र, या प्रकाराकडे तालुका क्रीडा केंद्र्राचे दुर्लक्ष होत आहे. येथील पोलीस ठाण्यापासून केवळ १00 मीटरवर असलेल्या कॅम्प मैदानात दारूच्या पार्ट्या करून अस्वच्छता करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत नाहीत, तसेच या ठिकाणची स्वच्छता पोलीस विभाग, पालिका व क्रीडा केंद्र संचालक का करत नाहीत, असा सवाल नागरिकांतून होत आहे.
कॅम्प मैदानाची सकाळी जागृती क्रीडा मंडळाच्या अॅथलेटिक्स प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या ७० प्रशिक्षणार्थ्यांनी ही सफाई केली.
यावेळी तेथे उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष शेखर कोयंडे, नगरसेवक यशवंत ऊर्फ दाजी परब, अॅड. शुभांगी सडवेलकर यांनी या छोट्या खेळाडूंचे कौतुक केले. तालुका क्रीडा केंद्र चालविणाऱ्या संस्थेने मैदानावर होणाऱ्या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.