मी भाजपबरोबर? कदापिही नाही!
By admin | Published: January 5, 2017 11:49 PM2017-01-05T23:49:08+5:302017-01-05T23:49:08+5:30
सदाभाऊ खोत : शेट्टी यांच्यासोबतची पंचवीस वर्षांची दोस्ती तुटायची नाही
सातारा : ‘काय म्हणता... मी भाजपबरोबर? कदापिही शक्य नाही. जे कोण ही चर्चा करीत आहेत, त्यांनाच विचारा, यामागचे कारण काय? कारण खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर असलेली पंचवीस वर्षांची दोस्ती तुटायची नाही,’ या शब्दांत साताऱ्याचे नूतन सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सहपालकमंत्री पद मिळाल्यानंतर गुरुवारी ते प्रथमच साताऱ्यात आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिल्यानंतर बोलत होते. सर्वप्रथम ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांनी ‘लोकमत टीम’शी संवाद साधला.
‘माझ्या कामाची पद्धत पाहूनच कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर आणखी काही खात्यांची जबाबदारी दिली असावी. याचा अर्थ मी लगेच माझा पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार, असा कसा होऊ शकतो? खरेतर विरोधक असल्यापासून माझी फडणवीस यांच्यासोबत चांगली मैत्री आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही अनेक विषय विरोधक म्हणून एकत्र येऊन राज्यात गाजविले आहेत. आमची मैत्री केवळ सत्तेपुरती नव्हती अन् राहणार नाही.’
मुख्यमंत्र्यांकडून
नवीन सूचनांचे स्वागत
मी शेतकरी संघटनेत काम करीत असल्याने ग्रामीण शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मला चांगली जाण आहे. यासंदर्भात काही सूचना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावर माझ्या सूचनांचे त्यांनी नेहमीच स्वागत केले, असेही सांगायला खोत विसरले नाही.