या रस्त्यावर मृत्यू लपून करतोय घात..!
By admin | Published: April 5, 2017 11:22 PM2017-04-05T23:22:24+5:302017-04-05T23:22:24+5:30
या रस्त्यावर मृत्यू लपून करतोय घात..!
सचिन काकडे ल्ल सातारा
सातारा शहरातील शाहू चौक ते बोगदा हा रहदारीचा महत्त्वाचा मार्ग आहे. दीड किलोमीटरच्या या प्रमुख मार्गाला तब्बल दहा उपमार्ग जोडले गेले आहेत. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांसह नागरिकांची संख्याही मोठी आहे. मात्र, कुठेही दिशादर्शक फलक अथवा गतिरोधक नसल्याने ‘वाहने भुंगाट आणि नागरिक कोमात,’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कास, बामणोली, शेंद्रे, ठोसेघर, सज्जनगड या ठिकाणी जाणारी शेकडो वाहने शाहू चौक-बोगदा मार्गेच पुढे जातात. या मार्गाच्या दोन्ही बाजूंना वसाहती असल्याने पायी चालत जाणाऱ्या नागरिकांसह शाळकरी मुलांची संख्याही अधिक आहे. वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा असला तरी सध्या हा रस्ता लहान-मोठ्या अपघातांमुळे चर्चेचा विषय बनला आहे.
शाहू चौक ते बोगदा हे अंतर जवळपास दीड किलोमीटर आहे. घोरपडे कॉलनी, शिर्के शाळा, कूपर मिल, गुरुवार बाग, शनिवार पेठ, शंकराचार्य मठ, काळा दगड, फुटका तलाव, राजवाडा, धस कॉलनी या ठिकाणी जाणारे जवळपास दहा उपमार्ग या मुख्य मार्गाला जोडतात. या दीड किलोमीटरच्या पट्ट्यात कोठेही दिशादर्शक फलक नाही की वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहावे, यासाठी गतिरोधक नाही. या प्रमुुख बाबींअभावी या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर कसलेच नियंत्रण नाही. परिणामी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या आबालवृद्धांना धोका पत्करूनच रस्ता ओलांडावा लागत आहे.
या मार्गावर आजपर्यंत अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकजण जखमीही झाले आहेत. या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी अत्यावश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक आणि गतिरोधकाची उभारणी केल्यास वाहनांच्या वेगावर मर्यादा येण्याबरोबरच अपघातांचे प्रमाणही कमी होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.