आ. ह. साळुंखे आणि जयसिंगराव पवार यांच्या लिखाणामुळे मी प्रभावित-सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 07:08 PM2022-04-22T19:08:59+5:302022-04-22T19:09:22+5:30
सातारा : ‘ज्येष्ठ साहित्यिक आ. ह. साळुंखे आणि जयसिंगराव पवार यांच्या लिखाणामुळे मी प्रभावित झाले. त्यांचे सर्व साहित्य मी ...
सातारा : ‘ज्येष्ठ साहित्यिक आ. ह. साळुंखे आणि जयसिंगराव पवार यांच्या लिखाणामुळे मी प्रभावित झाले. त्यांचे सर्व साहित्य मी वाचत आहे, या दिग्गज साहित्यिकाची भेट घेण्याच्या उद्देशाने साताऱ्याला आले आहे,’ अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना साताऱ्यात धावता दौरा केला. शाहूपुरी येथील ज्येष्ठ साहित्यिक आ. ह. साळुंखे यांची त्यांच्या निवासस्थानी सुप्रियाताईंनी भेट घेऊन सुमारे सव्वा तास त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी आ. ह. साळुंखे यांचे चिरंजीव राकेश साळुंखे उपस्थित होते.
या भेटीमध्ये त्यांनी आ. ह. साळुंखे यांच्या साहित्यकृती वाचलेले संदर्भ, आवडलेले पुस्तक आणि त्या साहित्यातील संदर्भाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांवर सुमारे सव्वा तास चर्चा केली. या चर्चेचा रोख हा संपूर्णपणे साहित्याशी संबंधित होता.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘ज्येष्ठ साहित्यिक आ. ह. साळुंखे यांचा व माझा परिचय फार पूर्वीपासून आहे. त्यांच्या साहित्याची मी पहिल्यापासून प्रशंसक आणि वाचक आहे. तात्यांचा नवनवीन साहित्यकृतींची मी नेहमीच माहिती घेत असते. या दौऱ्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता. या भेटीमध्ये मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून साहित्य संदर्भाच्या अनुषंगाने चर्चा केली.’
दरम्यान, राष्ट्रवादी भवनला खासदार सुळे यांनी भेट दिली. आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांचे याठिकाणी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यावेळी उपस्थित होते.
कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य बुद्धीला न पटणारे
या ठिकाणीही पत्रकारांनी त्यांना महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, त्यांनी नाराजी व्यक्त केली. कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य हे बुद्धीला पटणारे नाही, असे त्या म्हणाल्या.
कोरोना नावाखाली केंद्राकडून निधी नाही
कोरोनाचे कारण पुढे करून केंद्र सरकारने खासदारांचा निधी बंद केलेला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये खासदारांना निधीच दिला नाही. केंद्र सरकार निधी देतच नसल्यामुळे खासदारांना कामे करण्यात त्यांना मर्यादा येत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.