काय करावं कळेना, नवऱ्याला नवरी मिळेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:34 AM2021-03-15T04:34:41+5:302021-03-15T04:34:41+5:30
रामापूर : पूर्वी पुरुषप्रधान समाजात मुलाकडील पारडे जड मानले जायचे. मुलीकडील मंडळी वेळप्रसंगी लग्न लावून देतो, मुलाला गाडी ...
रामापूर : पूर्वी पुरुषप्रधान समाजात मुलाकडील पारडे जड मानले जायचे. मुलीकडील मंडळी वेळप्रसंगी लग्न लावून देतो, मुलाला गाडी देतो, असे सांगून मुलीचा विवाह ठरविण्यासाठी मुलाच्या घराचे उंबरे झिजवतांना दिसत होते. मात्र, सध्या काळ बदलला आहे. मुलीच्या नव्हे तर मुलाच्या विवाहासाठी त्याच्या मातापित्यांना मुलीच्या घराचे उंबरे झिजविण्याची वेळ आली आहे.
निसर्गावर अवलंबून असणारी शेती आणि आजच्या काळात शेतीला आलेले वाईट दिवस यामुळे शेतकरी मुलांना विवाहासाठी वारंवार नकार मिळत आहे. कमी शिक्षण झालेली मुलगीही शहरात नोकरी करणाऱ्या मुलाला पसंती देत असल्याने शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांसमोर अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. मुलाला चांगल्या कंपनीत नोकरी, शिक्षक, पोलीस, जवान, वरिष्ठ अधिकारी अशा चांगल्या नोकऱ्या असूनही वरपित्याला मुलींच्या घरचे उबंरठे झिजवावे लागत आहेत. नोकरदारांना वधूपित्याकडून पसंती दिली जात असली तरीही मुलीचा पिता आपला भाव वाढवताना दिसत आहे. पूर्वी नोकरीला दुय्यम स्थान देणाऱ्या समाजाने आता शेतीला दुय्यम स्थान देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे घरी चारचाकी गाडी, टॅक्टर आणि भरपूर शेती असूनही फक्त मुलगा शेतकरी असल्याचे कारण देत वधू आणि तिच्या पित्याकडून त्याला नापसंत केले जात आहे. पाच ते दहा एकर शेती असूनही शेतकरी मुलाचा विवाह जमत नसल्याचे चित्र आहे. अशा कुटुंबातील मुलाच्या पित्याकडून वधूच्या पित्याची समजूत घालण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करावे लागत आहेत. प्रसंगी भांड्यांसह दोन्हीकडील लग्नाचा खर्च करण्यासही काही वरपिता तयार आहेत. मात्र, तरीही मुलाचे लग्न समज नसल्याचे दिसते. मुलाचा संसार उभा करण्यासाठी त्याचे वडील पायाला भिंगरी बांधून गावोगावी फिरत आहेत. मुलाला शहरात चांगली नोकरी, बंगला किंवा फ्लॅट, गाडी असे वातावरण असणाऱ्या कुटुंबाला वधूपित्याची अधिक पसंती आहे. मात्र, नोकरी, फ्लॅट, गाडी असूनही इतर कारणास्तव अनेक मुलांना नकाराचा सामना करावा लागत आहे.
पूर्वी मुलांचे शिक्षण अधिक असायचे. त्यामुळे कमी शिक्षण असलेल्या मुलींकडून त्यांना सहज होकार मिळायचा. मात्र, सध्या मुली मुलांपेक्षा अधिक शिक्षण घेऊन चांगल्या पगाराच्या नोकऱ्या करीत आहेत. अगदी ग्रामीण भागांतही सर्वसामान्य कुटुंबातील मुली बीए, एमए, बीएड, डीएड, बी.एस्सी, एम.एस्सी, बी.कॉम, एम.कॉमपर्यंत शिकलेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच मुलींच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.
- चौकट
मध्यस्थांचा भाव वधारला
विवाह जमवून देण्यासाठी मध्यस्थी करणे हा सध्या व्यवसाय बनला आहे. पूर्वी समाजकार्य किंवा सामाजिक भान म्हणून अनेकजण मध्यस्थी करीत विवाह जमवून द्यायचे. मात्र, सध्या याकडे व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे. अनेकांनी वधू-वर सूचक संस्था सुरू केल्या असून, त्याद्वारे वधू आणि वर पित्याकडून कमिशनपोटी हजारो रुपये कमावले जात आहेत.
- चौकट
बायोडाटा पहायचाय..? मग द्या पैसे !
मध्यस्थी करणाऱ्यांनी सध्या पैसे कमावण्याचा अनोखा फंडा सुरू केला आहे. मुले आणि मुलींचे शेकडो बायोडाटा या मध्यस्थांकडे असतात. एखाद्या मुलाचा पिता जुळतय का, हे पाहण्यासाठी संबंधित मध्यस्थाकडे गेल्यास त्याला हे मध्यस्थी बायोडाटा देतो, असे सांगून पैसे घेत आहेत. केवळ बायोडाटा देण्यासाठी मध्यस्थी मुलांच्या पालकांकडून ५०० ते १००० रुपये घेत आहेत.
फोटो : १४केआरडी०४
कॅप्शन : प्रतीकात्मक