‘मला जगायचे नाही’ म्हणत कपाळावर मारली बेडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:34 AM2021-03-14T04:34:47+5:302021-03-14T04:34:47+5:30
सातारा : ‘मला जगायचे नाही’ असे म्हणत कपाळावर बेडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न मोक्क्यातील आरोपीने केला. हा प्रकार शुक्रवार, ...
सातारा : ‘मला जगायचे नाही’ असे म्हणत कपाळावर बेडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न मोक्क्यातील आरोपीने केला. हा प्रकार शुक्रवार, दि. १२ रोजी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाच्या बाहेर घडला.
याबाबत अधिक माहिती अशी, निखिल प्रकाश वाघमळे (वय २८, रा. आरळे, ता. जि. सातारा) याच्यावर विविध गुन्हे दाखल असून, सध्या तो अटकेत आहे. नुकतीच त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास त्याला अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या कार्यालयात चौकशीसाठी आणले होते. यावेळी त्याने अचानकपणेच ‘मला आता जगायचे नाही’ माझे जगणेच मुश्कील झाले आहे. मी आता जीवच देतो,’ असे म्हणत त्याने उजव्या हातात असणारी बेडी कपाळावर जोरात मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या कार्यालयातच हा प्रकार घडल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली. बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी त्याला तत्काळ रोखले. दरम्यान, याबाबत पोलीस शिपाई दिगंबर सुरेश वाघेरे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर निखिल वाघमळे याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.