'मशागत करुन मी पीकही चांगलं आणलंय', शिवेंद्रराजेंच्या भाजपा प्रवेशावर पवार म्हणाले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 04:07 PM2019-07-28T16:07:05+5:302019-07-28T16:07:51+5:30
दीपक पवार : शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशावर सूचक वक्तव्य; भावी आमदार मीच असं स्पष्टीकरणही
सातारा : ‘भाजपमध्ये राहून चांगली मशागत करुन मी पीकही चांगलं आणलंय. आता पक्षात येणाऱ्यांना हे पीक मी काढू देईन काय? असे सूचक वक्तव्य पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप पक्षप्रवेशावर केले. तसेच सातारा मतदारसंघातून भावी आमदार मीच असणार आहे. त्यासाठीच पक्षाने मला पद देऊन ताकद दिलीय, असेही त्यांनी सांगितले.
येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी बुवासाहेब पिसाळ, सुधीर पवार, गीता लोखंडे, सागर पावशे, दत्तात्रय साळुंखे, दादा रसाळ आदी उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दीपक पवार यांनी प्रथमच साताºयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांनाही उत्तर दिले. पवार म्हणाले, ‘भाजपमध्ये चांगले काम करणाऱ्यांना ताकद देण्याचे काम होते. तेच काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. सातारा विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना, बुथ बांधणी चांगली केलीय. त्यामुळेच अभ्यास करुन हे पद दिलंय. तसेच विधानसभा निवडणुकीत ताकद मिळेल हेच यातून पाहिलंय.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाविषयी तुमचे मत काय? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर पवार म्हणाले, ‘अजून शिवेंद्रसिंहराजे हे भाजपात आले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी काय बोलणार?. सध्यातरी विधानसभेचा उमेदवार म्हणून मीच आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगतात शिवेंद्रसिंहराजे आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे पक्षात कोण येणार का ? म्हणून मी कशाला वाट पाहू. त्यांना भाजपमध्ये घ्यायचे असेल तर पक्ष आमच्याशी चर्चा करेल. त्यावेळी आमचे मत मांडू.
गेल्या काही वर्षांपासून आमची निकामी आमदार हटाव म्हणून मोहीम सुरू आहे. जनतेनंही ठरवलंय आमदारांना हटवायचं. आमदारांनी आमदार निधीव्यतिरिक्त कोणतेच काम आणलं नाही. सातारा मतदारसंघातील जनतेच्या हातातच निकाल आहे. अमित कदम हे भाजपमध्ये आहेत. त्यांच्याबरोबरच आमचे घरचे संबंध आहेत. आमची बैठकही झालीय, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मानकुमरे म्हणतात स्वाभिमानानं लढा; पण ते आमदारांचंच काम करणार...
पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्याविषयी दीपक पवार यांनी भाष्य केले. मानकुमरे म्हणतात तुम्ही तालुक्यातील आहात. जोरदार व स्वाभिमानाने लढा असं त्यांनी सांगितलय. पण, ते शेवटी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचेच काम करणार, असेही पवार यांनी म्हटले.