मी हृदयात आहे, असं म्हणणाऱ्यांचं हृदय तपासावं लागेल- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 04:38 PM2019-08-01T16:38:03+5:302019-08-01T16:38:23+5:30

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

I have to check the heart of those who say that I am in the heart - Sharad Pawar | मी हृदयात आहे, असं म्हणणाऱ्यांचं हृदय तपासावं लागेल- शरद पवार

मी हृदयात आहे, असं म्हणणाऱ्यांचं हृदय तपासावं लागेल- शरद पवार

Next

साताराः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. फक्त तीन नेते गेले म्हणजे मेगा भरती होत नाही. शिवेंद्र राजेंनी भेटून मला सांगितलं होतं की, पक्ष सोडणार नाही. पण वादाचं कोणतंही कारण न देता त्यांनी अखेर पक्ष सोडला. त्यांच्या भाजपा प्रवेशानं राष्ट्रवादीला काहीही फरक पडणार नसून साताऱ्याची जागा राष्ट्रवादी निवडून आणेल, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला आहे. सातारा येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, साताऱ्यात खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात बोलणी करून द्यावी अशी अपेक्षा शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केली होती. त्यांना अधिवेशनानंतर चर्चा करू असे म्हटले होते. पण, तोपर्यंत ते थांबले नाहीत. असे स्पष्ट करून पवार पुढे म्हणाले, मला तर त्यांनी राष्ट्रवादी सोबतच असल्याचे सांगितले होते. पण, ते असे सत्य सोडून सांगतील याबाबत माहिती नव्हते. गेल्या पंधरा वर्षांपासून खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमच्यासोबत आहेत. ते अचानक असा निर्णय घेतील याची कल्पना नव्हती. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने आणि संस्काराने राज्यात सरकार स्थापन करण्यात आले. तो एक विचार होता. तो ज्यांनी स्वीकारून काम सुरू केले त्यांना थोडाफार त्रास होईल. पण, ज्यांची नाळ मातीशी आणि कार्यकर्त्यांशी जोडलेली आहे. ते इतरत्र जाणार नाहीत.

राज्यात मनोहर जोशी आणि नारायण राणे यांनीही मुख्यमंत्री म्हणून काम केले. पण, त्यांनी अशाप्रकारे लोकप्रतिनिधींची कामे करायचीच नाहीत. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास द्यायचा असे काम कधीच केले नाही. सध्याचे सत्ताधारी हे विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींशी सुडबुद्दीने वागत आहेत. तो त्रास ज्यांना सहन होत नाही ते पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत.

Web Title: I have to check the heart of those who say that I am in the heart - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.