मला 'किंगमेकर' व्हायची हौस नाही ;आमदार अतुल भोसलेंचा नाव न घेता एड. उदयसिंह पाटील-उंडाळकरांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 21:06 IST2025-04-03T21:06:22+5:302025-04-03T21:06:36+5:30
असे सांगत मला किंगमेकर व्हायची हौस नाही, असा टोला आमदार डॉ. अतुल भोसले यांनी नाव न घेता एड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना लगावला.

मला 'किंगमेकर' व्हायची हौस नाही ;आमदार अतुल भोसलेंचा नाव न घेता एड. उदयसिंह पाटील-उंडाळकरांना टोला
प्रमोद सुकरे
कराड- 'सह्याद्रि'चा सहकारी साखर कारखान्याचा मी सभासद नाही. परंतु, सहकारामध्ये मदतीचे राजकारण करायची संस्कृती असून त्यांच्या राजकारणात हस्तक्षेप करायचा नाही, ही आमची भूमिका आहे. असे सांगत मला किंगमेकर व्हायची हौस नाही, असा टोला आमदार डॉ. अतुल भोसले यांनी नाव न घेता एड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना लगावला.
येथील शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधताना भोसले बोलत होते.
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत तुमची भूमिका काय? याबाबत माध्यमांनी छेडले असता भोसले म्हणाले, दिवंगत जयवंतराव भोसले, डॉ. सुरेश भोसले आणि मीही सहकारात काम करताना इतर कोणत्याही सहकारी संस्थांना मदतीचे राजकारण करायचे, त्यांच्यात हस्तक्षेप करायचा नाही, हिच आतापर्यंतची आमची भूमिका राहिली आहे.तीच भूमिका आज कायम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याला ऊस घालतात, त्या सभासदांनी योग्य ते निर्णय घ्यावा. असे सांगत आ. डॉ. भोसले म्हणाले, किंगमेकर म्हणून स्वतःचे पोस्टर इकडे-तिकडे लावून घेण्याची मला हौस नाही, नाव न घेता हा टोला त्यांनी उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना लगावला. त्याचबरोबर आपण आपल्या कार्यक्षेत्रात आपापली भूमिका मांडत असतो. इतरांचा संस्थांमध्ये ढवळाढवळ करणे, हे सहकाराच्या संस्कृतीला अनुसरून नाही. त्यामुळे आपण सह्याद्रि'च्या निवडणुकीत हस्तक्षेप करणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हा संशोधनाचा भाग
सह्याद्रि'च्या निवडणुकीत भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्षांची भूमिका वेगवेगळी दिसत असून दोन्ही बाजूला तुमची छबी दिसत आहे? या प्रश्नावर बोलताना आ. अतुल भोसले म्हणाले, हा खरं तर संशोधनाचा भाग आहे.त्यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला. तसेच या प्रश्नाला बगल देत ते म्हणाले, आमच्या पक्षात मोठी इन्कमिंग सुरू आहे. लवकरच याबाबत मोठा धमाका होईल, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.