मला साडेतीन लाखांचेच मताधिक्य; उदयनराजेंचा दावा;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:59 PM2019-06-21T23:59:25+5:302019-06-21T23:59:30+5:30
सातारा : ‘सातारा लोकसभा मतदार संघात आपल्याला खात्रीने साडेतीन लाखांचे मताधिक्य आहे,’ असा दावा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ...
सातारा : ‘सातारा लोकसभा मतदार संघात आपल्याला खात्रीने साडेतीन लाखांचे मताधिक्य आहे,’ असा दावा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. ‘मी राजीनामा देतो पुन्हा फेरमतदान होऊ दे. तितक्याच मताधिक्याने निवडून येईन,’ असा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणूक घेण्याची तयारी आहे का ?, असा सवाल उपस्थित केला आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईव्हीएम मशीनमुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप करत उदयनराजे यांनी ही यंत्रणा म्हणजे देशाच्या व्यवस्थेला लागलेली कीड आहे, ती उखडून टाकायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने अधिकाराने या विषयावर भाष्य करायला हवे. मात्र, या विषयावर दाद मागणाºयालाच कारवाईची भाषा वापरली जाते, हे चुकीचे असल्याचे मत खा. उदयनराजे यांनी व्यक्त केले.
देशभरातील ३७६ मतदार संघांमध्ये ईव्हीएम मशीनमधील मतांच्या आकडेवारीत घोळ झाला आहे. सातारा लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान व मतमोजणी यांच्यामध्ये चक्क ६७२ मतांचा फरक आहे.
ईव्हीएम मशीनच्या वैधतेबाबत कायदेपंडितांनी जी ठामपणे विधाने केली ती कोणत्या आधारावर केली. निवडणूक ही जनतेच्या पैशांवर होते, त्याची उधळपट्टी करण्याचा अधिकार कोणाला नाही. एक हजार मते मोजणाºया एका ईव्हीएम मशीनची किंमत तेहतीस हजार म्हणजे एका मताची किंमत १ रुपया ३० पैसे आणि बॅलेट पेपरने निवडणूक घेतल्यास अवघा तेराशे रुपये खर्च येतो. ईव्हीएम मशीनवर तब्बल ४ हजार ५५५ कोटी रुपये खर्च झाला. जर ईव्हीएम मशीन निर्वेध होत्या, मग सहा विधानसभा मतदार संघात ६७२ मतांचा फरक कसा पडला ? असा सवाल उदयनराजे यांनी केला.
...मग राजेशाही काय वाईट होती?
उदयनराजे कधी रडीचा डाव खेळत नाही, लोकशाहीचा गळा घोटणाºया या यंत्रणेपेक्षा राजेशाही काय वाईट होती ? या प्रकाराला वेळीच पायबंद घातला नाहीतर १८५७ च्या बंडाप्रमाणे सर्वत्र रक्तपात होऊन सारी व्यवस्था नष्ट होईल, अशी भीती उदयनराजे यांनी व्यक्त केली.