बायकापोरांची आठवण येते म्हणून आपटले डोके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:41 AM2021-08-22T04:41:59+5:302021-08-22T04:41:59+5:30
सातारा : येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा कारागृहातील प्रिझन वार्डमध्ये एका आरोपीने भिंतीवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...
सातारा : येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा कारागृहातील प्रिझन वार्डमध्ये एका आरोपीने भिंतीवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नाना पाटेकर उर्फ यश भाऊबीज उर्फ भावज्या बापू भोसले उर्फ काळे (वय २१, रा. आरफळ, ता. सातारा) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. बायकापोरांची आठवण येते म्हणून डोके आपटल्याचा कांगावा त्याने केला.
सातारा आणि कोरेगाव येथे प्रत्येकी एक तर भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत तार चोरीचे चौदा असे सोळा गुन्हे दाखल असणारा हा आरोपी गेल्या काही वर्षांपासून फरार होता. सातारा एलसीबीने त्याला जेरबंद केल्यानंतर त्याची चौकशी सुरु होती. त्याला पोलीस कोठडीही देण्यात आली आहे. तो आजारी असल्यामुळे त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील प्रिझन वार्डमध्ये उपचार सुरु होते. शुक्रवार, दि. २० रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पोलीस कोठडीत असताना त्याने ‘मला माझ्या बायकापोरांना भेटायचे आहे’, असे म्हणून आरडाओरडा करण्यास सुरुवात करत भिंतीवर डोके आपटून घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, येथे त्याने औषधोपचार करुन घेण्यास नकार दिला. याबाबतची तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस नितीन पवार यांनी दिली. त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस नाईक वाघ करत आहेत.