पोवई नाक्यावर उभा राहणार 'आय लव्ह सातारा' सेल्फी पॉईंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:38 AM2021-01-25T04:38:53+5:302021-01-25T04:38:53+5:30
सातारा : पोवई नाका अर्थात छत्रपती शिवाजी महाराज सर्कल येथे ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाल्यानंतर आता याच पोवई नाक्यावर ...
सातारा : पोवई नाका अर्थात छत्रपती शिवाजी महाराज सर्कल येथे ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाल्यानंतर आता याच पोवई नाक्यावर 'आय लव्ह सातारा' आयलँड, सेल्फी पॉईंटची लवकरच उभारणी होणार आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि वेदांतिकाराजे भोसले यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून सेल्फी पॉईंट उभारणीसह पोवई नाका येथे सुशोभीकरण केले जाणार आहे
प्रत्येक शहराची एक खास ओळख असते. सातारा शहर हे तर ऐतिहासिक शहर असून पोवई नाका हे सातारा शहराचे महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. याच पोवई नाक्यावर आठ रस्ते एकत्र येतात आणि कराड, कोरेगाव, माण, फलटण, खंडाळा, वाई, महाबळेश्वर तालुक्यातून याच ठिकाणी प्रथम प्रवेश होतो. त्यामुळे पोवई नाक्याला ऐतिहासिक आणि विशिष्ट स्थानिक असे महत्त्व आहे. याच पोवई नाक्यावर नुकतीच ग्रेड सेपरेटरची उभारणी झाली असून वाहतूक सुरळीत झाली आहे.
कोल्हापूर, कराड यासह अनेक शहरांमध्ये सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर सातारा शहराची आगळी वेगळी ओळख सांगणारा आय लव्ह सातारा सेल्फी पॉईंट तयार करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी भव्यदिव्य सुशोभीकरण करण्यात येणार असून हा आयलँड लक्षवेधी असणार आहे. सातारकरांसह बाहेरून येणारे पर्यटक, प्रवासी यांच्यासाठी हा सेल्फी पॉईंट एक प्रकारचे पर्यटनस्थळ असणार आहे. या सेल्फी पॉईंटबाबत सातारकरांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.