दिसली जाळी की भरतेय धडकी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:40 AM2021-02-16T04:40:40+5:302021-02-16T04:40:40+5:30
सातारा : समर्थ मंदिर मार्गावरील मुख्य रस्त्यावर असलेली संरक्षक जाळी सध्या वाहनधारकांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. व्हॉल्व्हवरील ही जाळी ...
सातारा : समर्थ मंदिर मार्गावरील मुख्य रस्त्यावर असलेली संरक्षक जाळी सध्या वाहनधारकांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. व्हॉल्व्हवरील ही जाळी गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याबाहेर आली आहे. रात्रीच्या वेळी ती नजरेच पडत नसल्याने दुचाकी आदळून अपघातही घडू लागले आहेत.
साताऱ्यातील शाहू चौक ते समर्थ मंदिर हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरून कास, सज्जनगड, शेंद्रे या ठिकाणी ये-जा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. शिवाय अनेक शाळकरी विद्यार्थी, नोकरदारांचीदेखील या मार्गावरून सतत ये-जा सुरू असते. या मार्गावर कुपर कारखान्यानजीक मुख्य रस्त्यावर पाणीपुरवठा करणारा व्हॉल्व्ह आहे. या व्हॉल्व्हवर सुरक्षिततेसाठी महाकाय लोखंडी जाळी बसविण्यात आली आहे. पूर्वी ही जाळी रस्त्याला समतल होती. मात्र, सततच्या कामामुळे जाळी उघडी पडली असून, ती आता रस्त्याच्या बाहेर आली आहे.
ही जाळी नजरेस पडत नसल्याने त्यावरून वाहने आदळण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकामंधून होत आहे.
फोटो : १५ जावेद १०
साताऱ्यातील कुपर कारखान्यानजीक व्हॉल्व्हवरील संरक्षक जाळी रस्त्याबाहेर आल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. (छाया : जावेद खान)