पाय चालतात तोपर्यंत जगायचे... नाहीतर जगाला रामराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:57+5:302021-06-11T04:26:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन झाला खरा... पण तो अनेकांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण करून ...

I wanted to live as long as I could walk ... otherwise the world would be fine | पाय चालतात तोपर्यंत जगायचे... नाहीतर जगाला रामराम

पाय चालतात तोपर्यंत जगायचे... नाहीतर जगाला रामराम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन झाला खरा... पण तो अनेकांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण करून गेला. सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील डोणी या गावची अशीच एक महिला स्वत:च्या पोटाला चिमटा काढून इतरांच्या उदरभरणासाठी करवंदे (रानमेवा) घेऊन विक्रीसाठी साताऱ्यात आली. दिवसभर करवंदे विकून परतायला उशीर झाला... अन् अर्ध्या रस्त्यात अडकली. माणुसकी जिवंत असलेल्या एका गृहस्थाने घरी सोडले; पण तिचे निरोपाचे वाक्य ऐकून तोही हादरला... स्वाभिमानी असलेल्या महिलेने म्हटले, ‘बाबा, सोडायला आलास म्हणून धन्यवाद... जोपर्यंत पाय चालतात तोपर्यंत जगायचे, नाहीतर मरायचे. त्याची तजवीजही करून ठेवली आहे.’

सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे पंधरा दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्यात आला होता. शहरावर अवलंबून असलेल्या काही गावांमध्ये उपजीविकेचे साधनही नव्हते. दरवर्षीप्रमाणे मे महिन्यात ठोसेघर परिसरातील काही महिला जांभळे, फणस आणि करवंदे विकण्यासाठी साताऱ्याला येतात. त्याच पद्धतीने या ठिकाणाहून येणाऱ्या एका दुधाच्या टेम्पोमधून गंगाबाई माने ही ७३ वर्षांची महिला करवंदे विकण्यासाठी साताऱ्यात आली. कारण फक्त दूध वितरणालाच परवानगी होती. लॉकडाऊन आहे याची तिला माहिती होती; पण घरातील अनेकांची पालन आणि पोषणकर्ती होती. नवरा नाही, दोन मुले त्यापैकी एक जण देवाघरी गेलेला, दुसऱ्याची बायको सोडून गेल्यामुळे तो सतत दारू पिऊन पडलेला. त्या मुलाला आणि त्याच्या मुलांनाही आजीबाईच सांभाळत होत्या. त्यामुळे करवंदे विक्रीतून चार पैसे मिळतील आणि काही दिवस पुढे ढकलता येतील म्हणून एवढ्या लॉकडाऊनमध्येही त्या साताऱ्यात आल्या. पोलिसांची नजर चुकवत दिवसभर साताऱ्यातील गल्लीबोळांतून फिरल्या आणि करवंदे विक्रीतून १५० रुपये मिळाले. यावर पुढील काही दिवस काढायचे म्हणून पळतपळत बोगद्याच्या बाहेर येऊन थांबल्या कारण बोगद्यातून पोलीस गाड्या अडवत असल्याने गाडीवाले लोकांना जाताना आणि येताना बोगद्याच्या बाहेरच सोडत होते.

आजीबाई टेम्पोची वाट पाहत बसल्या; पण टेम्पो काही येईना... पाऊस तर जोरात कोसळत होता. अंग सावरून त्या काही तास बोगद्याच्या सुनसान रस्त्यावर उभ्या होत्या. अनेकांनी त्यांची उलाघाल पाहिली; पण काही करता येत नव्हते. बंदोबस्ताला असलेले होमगार्ड तेजस निपाणे आजीबाईंची ही अवस्था पाहत होते; पण लॉकडाऊनची ड्यूटी सोडून त्यांनाही काही करता येईना. अखेर त्यांनी या परिसरातील शिवसेनेचे कार्यकर्ते अजय सावंतांना ही परिस्थिती सांगितली. त्यांनी सेनेचे तालुका उपप्रमुख सचिन मोहिते यांना माहिती दिली आणि मोहिते यांनी अत्यंत आपुलकीने आजीबाईंना गावापर्यंत पोहोचवले. याच स्वाभिमानी आजीबाईंनी आपल्यासोबत इतरांचा भार सहन करत जगायचे आणि ज्यादिवशी हातपाय चालायचे बंद होतील त्यादिवशी मरायचे, अशी केलेली व्यवस्था अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करून जाते.

चौकट

घरची परिस्थितीही थक्क करणारी

घरातील परिस्थिती पाहून तेदेखील थक्क झाले. मुलगा दारू पिऊन पडलेला, भरपावसात नातवंडे आजीची वाट पाहत बसलेली, आजी आली नसती तर काय, अशी त्यांची स्थिती. पैसे आहेत; पण घरात काही खायला नाही म्हणून एक अन्नधान्याचे किटही सोबत दिले; पण आजीबाईंना ते फुकट नको होते. दिवसभर करवंदे विकून आलेल्या पैशातील ५० रुपये त्यांनी मोहितेंच्या हातावर ठेवले आणि त्यांच्याही डोळ्यात पाणी तरळले.

कोट

ग्रामीण भागातील अनेकांचे संसार असे रानभाज्या आणि रानमेव्यावर चालतात. त्यांच्यापर्यंत सोयी-सुविधा पोहोचणे आवश्यक आहे. अनेकदा त्यांना काहीच मिळत नाही; पण शासन दरबारी मात्र अन्नधान्य पोहोच झालेले असते. अशा अनेक गंगाबाई आहेत. त्यांची दखल घ्यावीच लागेल.

-सचिन मोहिते, तालुका उपप्रमुख, शिवसेना

Web Title: I wanted to live as long as I could walk ... otherwise the world would be fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.