इचलकरंजीत पंचगंगा नदी पुन्हा बनतेय गटारगंगा

By admin | Published: January 20, 2017 12:12 AM2017-01-20T00:12:29+5:302017-01-20T00:12:29+5:30

प्रदूषण प्रश्न : उपसा बंद करावा लागणार; पाणीटंचाईची भीती; आगामी सहा महिन्यांसाठी पाण्याचे नियोजन होण्याची गरज

Ichalkaranjeet re-formed the Panchaganga river, | इचलकरंजीत पंचगंगा नदी पुन्हा बनतेय गटारगंगा

इचलकरंजीत पंचगंगा नदी पुन्हा बनतेय गटारगंगा

Next

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावली असून, पाण्यात मिसळणारे सांडपाणी आणि कचरा यामुळे पाण्यास दुर्गंधी येऊ लागली आहे. दरवर्षीप्रमाणे नदीतील पाणी प्रदूषित होऊन नगरपालिकेस पुन्हा पाण्याचा उपसा बंद करावा लागणार आहे. आगामी सहा महिने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती आहे.
दरवर्षी पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावते. त्याचबरोबर ग्रामीण परिसराबरोबर इचलकरंजीतील यशोदा नाला व काळा ओढा यातून सांडपाणी नदीपात्रात येते. त्याचबरोबर नागरिकांनी नदीच्या पाण्यात टाकलेले निर्माल्य, कचरा, आदी कुजल्याने नदीतील पाणी काळे पडते व त्याला दुर्गंधी येते. यंदाही येथील पंचगंगा नदीत तेच घडते आहे. त्यातच नागरिकांनी धुतलेली जनावरे व कपडे धुण्याची भर पडत आहे.
अशा पार्श्वभूमीवर राधानगरी किंवा काळम्मावाडी धरणातून सोडलेल्या पाण्याबरोबर कोल्हापूर व ग्रामीण परिसरातील सांडपाणी वाहत येते. त्याचा परिणाम म्हणून येथील नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होते. असे पाणी पालिकेच्या शुद्धिकरण केंद्रात शुद्ध केले तरी त्याचा काळसर रंग व दुर्गंधी कमी होत नाही. अखेर नगरपालिकेला पंचगंगा नदीतील पाण्याचा उपसा बंद करावा लागतो आणि कृष्णा नदीतील पाणी उपशावरच अवलंबून राहावे लागते. याचा परिणाम म्हणून सध्या तीन दिवसांतून एकवेळ मिळणारे पाणी पाच दिवसांतून एक वेळ मिळते. एकूणच शहरवासीयांना पुन्हा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार, अशी भीती व्यक्त होत आहे.
गतवर्षी पंचगंगा नदीमधील दूषित पाण्याची तीव्रता वाढल्यामुळे पाण्याचा उपसा बंद होता. त्याच दरम्यान कृष्णा नदीतील पाण्याची पातळीसुद्धा खालावल्यामुळे एप्रिल महिन्यातच नदीपात्रातील इंटकवेलचे व्हॉल्व्ह रिकामे पडले आणि पाणीटंचाई भासू लागली. नदीमध्ये पिण्याचे पाणी सोडावे, यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी जोरात प्रयत्न केले. सुरुवातीला नगरपालिका व आमदार हाळवणकरांच्या प्रयत्नांना पाटबंधारे खात्याने दाद दिली नाही. मात्र, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हस्तक्षेप करून कोल्हापूर व सांगली जिल्हाधिकाऱ्यांना समन्वय घडवून आणला. त्यामुळे इचलकरंजीस पाणीपुरवठा करणाऱ्या मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील पाणी उपसा करणाऱ्या नळ योजनेच्या जॅकवेलला पुरेसे होईल इतके पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. यंदासुद्धा पाणीटंचाईच्या तीव्रतेवर उपाय करण्यासाठी आतापासूनच नियोजन होणे अत्यंत गरजेचे आहे.

‘पंचगंगा’ प्रवाही ठेवण्याची मागणी
पंचगंगा नदीतील पाण्याचे प्रदूषण कमी व्हावे, याकरिता काळम्मावाडी नदीमध्ये असलेला अतिरिक्त पाणीसाठा नियोजनबद्धरीत्या वारंवार नदीपात्रात सोडून पंचगंगा प्रवाही ठेवली असता दूषित पाण्याची समस्या आणि त्याचबरोबर पाण्याची टंचाई भासणार नाही. याबाबत आतापासूनच नगरपालिका व लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Ichalkaranjeet re-formed the Panchaganga river,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.