दहिवडीच्या ‘आदर्श’ शाळेला ‘आयएसओ’
By admin | Published: December 15, 2015 09:42 PM2015-12-15T21:42:53+5:302015-12-15T23:39:43+5:30
शिक्षक हरखले : दुष्काळी भागातील खासगी संस्थेला मानांकन देऊन प्रथमच गौरव
दहिवडी : खासगी शाळांमध्ये सातारा जिल्ह्यातील पहिली ‘आयएसओ’ मानांकन होण्याचा माण दहिवडी येथील आदर्श मराठी प्राथमिक शाळा सेमी इंग्लिश या शाळेला मिळाला. दि. ९ डिसेंबर रोजी ‘आयएसओ’चे प्रतिनिधी जुबेर शिकलगार यांनी मानांकनाचे प्रमाणपत्र शाळेचे मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांच्याकडे प्रदान केले.६ जून १९८६ रोजी शाळेची स्थापना प्रा. आर. बी. जाधव यांनी केली. १८ विद्यार्थ्यांवर सुरू होणारी शाळा आता या शाळेत ३७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माण तालुक्यातील पहिली खासगी शाळा, इतर शाळांनी स्पर्र्धा करूनही या शाळेच्या गुणवत्तापूर्वक शिक्षणाचा विक्रम कोणाला मोडता आला नाही. हे शाळेचे कामकाज पाहून शासनाने १९९७ साली शाळेला कोणताही टप्पा न लावता थेट शंभर टक्के अनुदान दिले. शाळेच्या विस्तारासाठी शासनाने एक एकर जागा मोफत दिली आहे. राज्य बालनाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकविणारा अभिषेक कुलकर्णी याच शाळेचा विद्यार्थी. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच या शाळेचा मुख्य ध्यास असल्याकारणाने पालकांचा ओढा या शाळेकडे अधिक आहे. या शाळेत दहिवडीसह गोंदवले बुद्रुक, गोंदवले खुर्द, किरकसाल, नरवणे, तडावळे, वडगाव, पळशी, सुरूपखानवाडी, उकिर्डे, आदी गावातील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहे. ‘आयएसओ’ मानांकनासाठी आवश्यक असणारे ६४ च्या ६४ निकष पूर्ण केले आहे. शाळेला सुसज्ज इमारत, रंगरंगोटी, बेंच व्यवस्था सर्व वर्गात लाईट, फॅन, इनव्हर्टरसह सुविधा, २५ कॉम्प्युटरची सुसज्ज इंटरनेटने जोडलेली संगणक लॅब व तिचा नियमित वापर, दोन हजार पाचशे पुस्तकांचे भव्य ग्रंथालय, नियमित पाच दैनिकांचे अंक उपलब्ध, ई-लर्निंग, डिजिटल क्लासरूम, नंबर वन स्रेहसंमेलने, क्रीडा स्पर्धा, पिण्याच्या पाण्याची उत्कृष्ट सोय, बागबगीचा, भव्य २००० स्क्वेअर फुटाचा प्रार्थना हॉल, वाढदिवस शुभेच्छा फलक, दोन युनिफॉर्म, ओळखपत्र, आदी गोष्टींनी शाळा सुसंपन्न आहे. मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांच्या परिश्रमातून ही शाळा यशस्वीतेकडे वाटचाल करीत आहे. यास शाळेचे शिक्षिका संगीता म्हेत्रस, रूपाली इंगळे, शुभांगी निकम, सुप्रिया घनवट, आस्मा शेख, उपशिक्षक प्रकाश मगर, जितेंद्र खरात, अविनाश शिंदे यांचे मोठे सहकार्य मिळत आहे. संस्थापक प्रा. आर. बी. जाधव व प्रा. सौ. जाधव यांची पाठीवर शाबसकीची थाप यामुळे ही शाळा ‘आयएसओ’मानांकन झाली. (प्रतिनिधी)