आदर्श शिक्षकच समाजाचा मार्गदाता आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:41 AM2021-09-26T04:41:48+5:302021-09-26T04:41:48+5:30
वरकुटे-मलवडी : ‘शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षकांनी मनापासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी काम करायला पाहिजे. नवीन पिढीचे मार्गदाते ...
वरकुटे-मलवडी : ‘शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षकांनी मनापासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी काम करायला पाहिजे. नवीन पिढीचे मार्गदाते असलेल्या गुरुजनांनी स्वतःच्या हिमतीवर शैक्षणिक विकास साधला पाहिजे. राजकारण वाईट नाही, राजकारणातसुद्धा करिअर केले पाहिजे. प्रत्येक तालुक्यात विमानतळ, रेल्वे स्टेशन झाले पाहिजे,’ असे प्रतिपादन माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले.
दहीवडी येथे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, सभापती ललिका विरकर, उपसभापती नितीन राजगे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य सुवर्णाताई देसाई, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी सोनाली विभूते, रासपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर, शरद दडस, अजित पाटील, ॲड. विलास चव्हाण, सचिन होनमाने उपस्थित होते.
प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘माण तालुक्यातील शिक्षक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी यशस्वी काम करत आहेत. दुष्काळी भागातील चित्र बदलण्यासाठी शिक्षक कार्यरत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिक्षणामुळे बदल झाला आहे. शिक्षकांनी चांगले उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वडगाव येथील शिक्षक संजय खरात यांनी घरोघरी जाऊन राबविलेला शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद आहे.’
मानसिंगराव जगदाळे म्हणाले, ‘जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून चांगले शिक्षण दिले जात आहे. सातारा जिल्हा परिषद शिक्षणासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवीत आहे. माण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचे काम दर्जेदार आहे.’