५०० पदार्थ ओळखा अन् ५००० जिंका
By admin | Published: September 11, 2016 12:01 AM2016-09-11T00:01:01+5:302016-09-11T00:25:08+5:30
खेड-नांदगिरी : इन्स्टंटच्या जमान्यात किचनच्या ज्ञानात पडतेय भर
वाठार स्टेशन : गौरी-गणपती सणाच्या निमित्ताने अन्नपूर्णा देवीला खेंड-नांदगिरी येथील एकनाथ वाघ या अवलियाने सलग ३७ वर्षे प्रसन्न केले आहे. इन्स्टंटच्या जमान्यात अन्न संस्कृतीतील ‘आपले पण’ टिकविण्यासाठी साडेतीन दशके गौरीपुढे आरास करून शेकडो पदार्थांची मांडणी करणं आणि माय-भगिनींना या पदार्थांची ओळख करून देणं हा जणू त्यांचा छंदच! यंदाही गौरीच्या निमित्ताने ५८५ प्रकारच्या पदार्थांची मांडणी त्यांनी केली. हे सर्व पदार्थ ओळखणाऱ्यांना तब्बल ५ हजार रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले... मात्र, यंदाही हे बक्षीस कोणी पटकावलं नाही!
सांप्रदायिक विचारांचा वारसा जोपासत वयाच्या ८७ व्या वर्षीही पाककलेची अद्भुत आवड असलेल्या कोरेगाव तालुक्यातील खेड-नांदगिरी गावातील एकनाथ वाघ यांनी आपल्या गौरीसमोर वेगवेगळ्या ५८५ प्रकारच्या पदार्थांची मांडणी करीत या दिवसाचा आपला वेगळेपणा चालू वर्षीही कायम ठेवला आहे. महिलांना पाककला पारंगत व्हावी यासाठी गौराई समोरील मांडलेले सर्व पदार्थ ओळखणाऱ्यास ५ हजार ५५१ रुपयांचे बक्षीसही त्यांनी जाहीर केले आहे. मात्र, ३७ वर्षांत कुणालाही हे सगळे पदार्थ ओळखणे शक्य झाले नाही.
संत सावतामाळी भक्त अन् उत्तम शेतकरी अशी ओळख असलेले खेड-नांदगिरीचे एकनाथ वाघ वडिलांच्या हट्टापायी अर्धवट शिक्षण सोडून शेतीची सांभाळावी लागली. पाककलेचा अनोखा छंद त्यांना असल्यामुळे बालवयातच त्यांनी पाककला पारंगत केली. गौराईसमोर ते स्वत: बनवलेल्या व बाहेरून खरेदी करून आणलेल्या पदार्थांची मांडणी करतात. या वर्षीही त्यांनी ५८५ पदार्थ मांडले होते यातील २८० पदार्थ त्यांनी स्वत: बनवलेले आहेत. (वार्ताहर)
नातेवाइकांकडे गणपतीच्या निमित्ताने जाणे झाले, तेव्हा पहिल्यांदा गौरीसमोर केलेली मांडणी मला भावली आणि पुढच्याच वर्षापासून मी आमच्याकडेही गौरी बसविल्या पहिल्या वर्षी पाच पदार्थ करून ठेवले. त्यानंतर सलग ३७ वर्षे हा उपक्रम राबविला. राज्यातील विविध ठिकाणांहून महिला माझे पदार्थ पाहायला येतात, या पदार्थांविषयी माहिती देऊन त्यांनीही असे पदार्थ करावेत याविषयी मार्गदर्शन करतो. माझ्यानंतर हा वारसा माझ्या पुढच्या पिढ्यांनी चालवावा, अशी इच्छा आहे.
- एकनाथ वाघ