अंगणवाडीच्या मुलांना मिळाले ओळखपत्र
By Admin | Published: September 3, 2014 08:41 PM2014-09-03T20:41:30+5:302014-09-04T00:09:08+5:30
बानुगडेवाडी : शाळेच्या आवडीसाठी उपक्रम
कऱ्हाड : बानुगडेवाडी येथील अंजुमन महिला सार्वजनिक विकास संस्थेमार्फत अंगणवाडीच्या मुलांना आकर्षक ओळखपत्र व खाउचे वाटप करण्यात आले. लहान वयात मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविला असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा शहिदा मुजावर यांनी सांगितले.
बानुगडेवाडी येथील अंजुमन महिला संस्था ही महिलांचे सशक्त व्यासपीठ असून संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून येथील अंगणवाडीच्या सर्व मुलांना आपली स्वत:ची ओळख करून देणारे आकर्षक ओळखपत्र तयार करून देण्यात आले
आहे.
तसेच अंगणवाडीपासून ते चौथीपर्यंतच्या सर्व मुलांना खाउचे वाटप करून आपल्या सामाजिक संस्थेचा वर्धापनदिन त्यांनी साजरा केला आहे. संस्थेच्या सदस्या माजी सरपंच सौ. सुरेखा बानुगडे यांनी अंगणवाडीस भिंतीवरील घडयाळाची भेट दिली.
संस्थेने बानुगडेवाडीसह परिसरातील विधवा, परितक्त्या महिलांना निराधार योजना, ६५ वर्षापुढील महिलांना श्रावणबाळ योजना या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. समाजातील अशा महिलांनी संस्थेशी संपर्क साधावा असे यावेळी उपाध्यक्षा नफिसा मुजावर यांनी आवाहन केले.
यावेळी मंदाकिनी मांडवेकर, सुरेखा मांडवेकर, हसिना मुजावर, बेगम मुजाावर, लता संकपाळ, शेहनाज मुजावर, हापिशा मुजावर आदींची उपस्थिती होती. अंगणवाडी सेविका नूरजहाँ मुजावर यांनी आभार मानले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)