साताऱ्यात यंदा शाडूच्याच मूर्ती
By admin | Published: July 6, 2014 12:25 AM2014-07-06T00:25:32+5:302014-07-06T00:32:01+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : ‘लोकमत’च्या मोहिमेला प्रशासनाची साथ
सातारा : ‘चला... बाप्पाचं पावित्र्य जपूया...’ या ‘लोकमत’ने सुरु केलेल्या मोहिमेला जिल्हा प्रशासनाने साथ दिली असून शनिवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी साताऱ्यात यंदा कमी उंचीच्या आणि शाडूच्या मुर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे आदेश दिले. जलस्त्रोत नष्ट होऊ नयेत तसेच जलप्रदूषण होणार नाही यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना हे करणे आवश्यक असल्याचे नमूद करतच पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, ढासळते पर्यावण संतुलन आणि पाण्याचे प्रदूषण या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने ‘चला... बाप्पाचं पावित्र्य जपूया...’ ही मोहीम सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी नियोजन भवनात जिल्हा पर्यावरण समितीची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीस नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, पोलीस उपअधीक्षक (गृह) मनोज पाटील, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधीक्षक बी. आर. बारबोले, शिक्षणाधिकारी प्रवीण आहिरे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, तहसीलदार राजेश चव्हाण, डॉ. हमीद दाभोळकर, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, मूर्तीकार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागने ३ मे २०११ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयानुसार ‘प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर करू नये, यासाठी जागृती आवश्यक आहे. नैसर्गिक रंग आणि शाडू अथवा मातीच्या मूर्तींचा वापर करून जलप्रदूषण टाळावे.’ बाजारातील उपलब्ध रंगाची चाचणी घेऊन पर्यावरणपूरक रंग उपलब्ध करुन देण्याविषयीच्या सूचना संबंधितांना दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अन्य विभागांशीही चर्चा केली. ते म्हणाले, ‘नगरपालिका, ग्रामपंचायतींनी आपल्या स्तरावर बैठका घेऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रबोधन करावे, त्याचबरोबर निर्माल्य कलशाची व्यवस्थाही करावी. तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनीही त्यांच्या स्तरावर बैठका घेऊन ‘एक गाव एक गणपती’ आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रयत्न करावेत. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी टाक्या, हौद यासारख्या साधनांची उपलब्धता नगरपालिकांनी करुन द्यावी. लहान आकारातील, पर्यावरणपूरक रंगातील, शाडूच्या तसेच मातीच्या गणेशमूर्तींचा वापर करुन दरवर्षी जलप्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. तत्पूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. शासन निर्णयाचे वाचनही त्यांनी केले. यावेळी विविध मंडळाचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)