गृहकलह पेटला तर सत्तेला हादरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:27 AM2021-06-11T04:27:00+5:302021-06-11T04:27:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा पालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडीने साडेचार वर्षांच्या कालावधीत ‘वचननामा’पूर्तीसाठी पुरेपूर प्रयत्न केले; परंतु ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा पालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडीने साडेचार वर्षांच्या कालावधीत ‘वचननामा’पूर्तीसाठी पुरेपूर प्रयत्न केले; परंतु नगरसेवकांमधील गटबाजी शहर विकासाला प्रेरक नव्हे तर मारक ठरू लागली आहे. आघाडीची प्रतिमा मलीन होत असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरसेवकांची कानउघाडणी करत एकदिलाने काम करण्याचा कानमंत्र दिला. हा सल्ला जर कोणी मनावर घेतला नाही तर आगामी पालिका निवडणुकीत सत्तेला मोठा हादरा बसू शकतो, याची जाण आता प्रत्येकाला ठेवावी लागणार आहे.
२०१६ रोजी झालेली सातारा पालिकेची निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली. कारण निवडणुकीचा हा सामना दोन आघाड्यांतच नव्हे तर उदयनराजे विरुद्ध शिवेंद्रसिंहराजे असा रंगला. अत्यंत अटीतटीच्या या लढतीत खा. उदयनराजे यांच्या शिलेदारांनी पालिकेचा गड काबीज केला. सत्ता स्थापन केल्यानंतर ‘आघाडी’ने वचननाम्याप्रमाणे विकासाची गाडी सुरू केली; परंतु अल्पावधीत या गाडीची चाके गाळात रुतून बसली अन् विरोधकांच्या हाती टीकेचे आयते कोलीत पडले. आघाडीतील नगरसेवकांमध्ये गटबाजी, हेवेदावे वाढू लागले. कोणीच कोणाला जुळवून घेईनासे झाले. आघाडी प्रमुखांचे कान भरण्याचे प्रकार वाढू लागले. याचा मोठा फटका शहर विकासाला बसला व आजही बसत आहे.
पालिकेच्या माध्यमातून शहरात ग्रेड सेपरेटरचे काम पूर्णत्वास आले. हे काम खरंच गरजेचे होते का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. शहरात सुरू असलेले भुयारी गटार योजनेचे काम सातारकरांच्या पचनी पडलेलं नाही. कास धरणाची उंची वाढून मुबलक पाणी मिळेल हे स्वप्न सातारकर तीन वर्षांपासून पाहत आहेत. मात्र, धरण कधी पूर्ण होणार हे निश्चित सांगता येत नाही. नव्याने हद्दवाढीत आलेल्या भागातील जनतेच्या देखील अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खा. उदयनराजेंची जनतेत मिसळून काम करण्याची पद्धत आहे. त्यांच्या प्रतिमेचा आधार घेऊन निवडून आलेले नगरसेवक मात्र जनतेत मिसळायला तयार नाहीत. कोरोनाने जनता पिचलेली असताना हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या नगरसेवकांनी जनतेला दिलासा दिला. मात्र, अनेकजण भिऊन घरात बसून राहिले. गेल्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. विस्कटलेली घडी सावरण्यासाठी आघाडीप्रमुुख उदयनराजे यांनी नगरसेवकांचे वेळोवेळी कानही टोचले; परंतु याचा फारसा प्रभाव न झाल्याचे दिसून येते. ही परिस्थिती अशीच राहिली तर आगामी पालिका निवडणुकीत राजकारण व सत्तेची समीकरणे बदलू शकतात. त्यामुळे नगरसेवकांनी गटतट विसरून राजेंचा ‘कानमंत्र’ मनावर घेणे गरजेचे बनले आहे.
(चौकट)
नाराजांची नाराजी कशी दूर करणार ?
उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश सातारा विकास आघाडीतील काही नगरसेवकांच्या पचनी पडलेला नाही. ‘आम्ही राजेंसोबत; पण भाजपासोबत नाही’ असेही काही जण बोलून दाखवतात. मध्यंतरी आघाडीचे काही नगरसेवक ‘ल्हासुर्णे’करांना भेटल्याची चर्चाही जोरदार रंगली. याशिवाय विकासकामांसाठी अडवणूक, अंतर्गत गटबाजी, हेवेदावे व मतभेदांमुळे आघाडीतील काही मंडळी नाराज आहे. मात्र, हे कोणीही उघड उघड बोलून दाखवत नाहीत. या सर्वांची नाराजी दूर करण्याचे आव्हानही आघाडी प्रमुखांना पेलावे लागणार आहे.
(चौकट)
शुक्राचार्यांचा शोध घ्या..
- पालिकेतील बऱ्याच भानगडींची आघाडी प्रमुुख खा. उदयनराजे भोसले यांना तसूभरही कल्पना नसते. मात्र, प्रत्येकवेळी त्यांचेच नाव पुढे करून काहीजण स्वत:ची पोळी भाजून घेतात.
- असे कृत्य करणाऱ्या व चुुकीची माहिती देऊन कान भरणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांचा आघाडी प्रमुखांनी शोध घेणे गरजेचे आहे.
- अशा व्यक्तींमुळे आघाडीची प्रतिमा जनसामान्यांमध्ये मलीन होऊ लागली असून, सत्ताधारी नगरसेवकांमध्ये गटबाजी वाढतच चालली आहे.
- आगामी निवडणुकीत जर पालिकेत सत्ता स्थापन करायची असेल तर आघाडीप्रमुखांना आता नव्या दमाची फळी उभी करायला हवी. शहरासह हद्दवाढीवर विशेष लक्ष द्यायला हवे.
लोगो : सातारा पालिका फोटो