दोषी असेन तर जनतेसमोर शिक्षा घेईन...
By admin | Published: January 13, 2017 10:30 PM2017-01-13T22:30:00+5:302017-01-13T22:30:00+5:30
जयकुमार गोरे : विधान परिषदेतील पराभवामुळे रामराजेंंनीच कुभांड रचल्याचा केला आरोप
सातारा : ‘माझ्याविरोधात वैचारिक व राजकीय लढाई करण्याची ताकद राहिली नसल्यानेच रामराजेंनी माझ्याविरोधात कुभांड रचले आहे. सभापतिपदाचा गैरवापर करून यंत्रणेवरही दबाव आणला. माझ्याविरोधात फिर्याद देणाऱ्यांशी रामराजेंचा संपर्क होता. लढाई कंबरेखाली नेऊन रामराजेंनी मला डिवचले आहे. मी दोषी असेन तर जनतेसमोर जाऊन शिक्षा भोगीन, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांत त्यांच्या विजारीच्या नाड्या सुटतील,’ अशी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
आ. गोरे म्हणाले, ‘मी चुकीचे काहीच केलेले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेताना खात्री करायला हवी होती. मी व्यक्तिगत आयुष्यात चुकीचे वागलो नाही. माझ्याविरोधात फिर्याद देणाऱ्या महिलेला शरीरसुखाची मागणी करणारा ‘एसएमएस’ मी केलेला नाही. पोलिसांनीही ज्या मोबाईल नंबरवरून हा एसएमएस आला, तो शोधून काढण्याची तसदी घेतली नाही.’
आपले राजकीय अस्तित्वच मान्य नसल्याने रामराजे आपल्यावर दात खावून आहेत. माण-खटावमधले अस्तित्व संपले. मी आमदार झालो. जिल्हा बँकेत संचालक म्हणून निवडून आलो. विधान परिषद निवडणुकीत तर राष्ट्रवादीचे प्राबल्य असताना मोठ्या फरकाने काँगे्रसला यश मिळाले. समोरासमोरच्या लढाईत मी कुठेच कमी पडत नाही. समोरून लढायला मी ऐकणार नाही, हे लक्षात घेऊन माझ्याविरोधात कुंभाड रचले गेले आहे. यात रामराजेंचा रोल मोठा आहे. मी जर खोटे आरोप करत असेन तर रामराजेंनी माझ्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करावा. माझ्याविरोधात रचलेले कुभांड आधीच रचले गेले असते तर विधान परिषद तरी वाचली असती.
दरम्यान, ज्या अल्बममध्ये अश्लील फोटो असल्याचे पोलिस सांगत होते, तो अल्बम मी पाहिला. त्यात फोटोमध्ये पाठविणाऱ्याचे नाव नाही. सायबर एक्स्पर्ट त्यांचे काम यथोचितपणे केले. मी पण फिर्याद दाखल केली होती.
माझ्याविरोधात फिर्याद देणाऱ्या संबंधित व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीने माझ्याकडे खंडणी मागितली होती. याचे पुरावे व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहेत. ३० दिवस होत आले तरी तो गुन्हा दाखल केला गेला नाही. नीतिमूल्यांचा ठेका मी काय एकट्यानेच घेतला नाही. माझ्या नावामागे मोठा इतिहास नाही. मी तो लिहायला घेतला. मात्र, त्यांच्यामागे मोठा इतिहास आहे. जो काय
फरक पडायचाय तो त्यांनाच पडेल, असेही आ. गोरे म्हणाले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक भरती प्रक्रिया बेकायदा आहे, असेही गोरेंनी सांगितले. (प्रतिनिधी)
विधान परिषदेच्या निकालापासून प्रक्रिया सुरू
विधान परिषदेत राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानंतर रामराजे हे फिर्यादी तसेच प्रदीप जाधव, विवेकानंद सावंत, शेखर गोरे यांच्या संपर्कात होते, हे कॉल डिटेल्सवरून लक्षात येते. प्रदीप जाधव हा खंडणी मागण्यासाठी फिर्यादीच्या वतीने माझ्याकडे आला होता. इंटरनेट पॅक मारायला पैसे नसणाऱ्याकडे २५ लाखांची रक्कम आली कुठून? प्रदीप जाधव असा कोण महान व्यक्ती आहे, ज्याला रामराजे १९ वेळा फोन करतात, असा सवालही गोरेंनी उपस्थित केला.
जयकुमारला गोळी घालणेच तेवढे राहिलेय
माझ्यासमोर जनतेच्या मैदानात लढणे शक्य नसल्याने कंबरेखाली वार सुरू केले आहेत. त्यातूनही मी तावून-सुलाखून निघणार आहे. त्यामुळे मला आता केवळ गोळी घालणे, तेवढेच बाकी ठेवले आहे, असेही गोरे यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
रामराजेच राष्ट्रवादीचा ऱ्हास करणार...
रामराजे नाईक-निंबाळकर स्वत:च यशवंतराव चव्हाणांची नीतिमूल्ये धुळीला मिळवून राष्ट्रवादीचा कारभार हाकत आहेत. माझ्याविरोधात कुभांड रचताना त्यांच्या पक्षातील आमदारांनीही विरोध केला. पण रामराजेंनी हट्टाने ते रचले रामराजेच राष्ट्रवादीचा ऱ्हास करतील, असे भविष्य आ. गोरेंनी वर्तविले.
चक्रव्युहातून बाहेर पडून जयकुमार साधणार जनतेशी संवाद !
म्हसवड : ‘खोटे गुन्हे दाखल करून आमदार जयकुमार गोरे यांना ऐन निवडणुकीत विनाकारण अडकविण्याचा विरोधकांचा बेत आम्ही हाणून पाडत आहोत. अटक होऊन जामीनही मिळाल्यानंतर थेट जनतेशी संवाद साधण्यासाठी रविवार, दि. १५ रोजी दुपारी चार वाजता दहिवडीतील बाजार पटांगणावर आमदार गोरे यांची जाहीर सभा होणार आहे,’ अशी माहिती बाजार समितीचे सभापती अरुण गोरे यांनी दिली. सभापती गोरे म्हणाले, ‘पुढील महिन्यात पार पडणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच आ. गोरे यांच्या अटक व जामीन प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगरपंचायत निवडणुकीपासून याप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आ. गोरेंना एका प्रकरणात नुकताच जामीन मंजूर झाला आहे. आ. गोरे आणि राष्ट्रवादीतील उभा संघर्ष संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. राष्ट्रवादीने आ. गोरेंना कात्रीत पकडण्याची एकही संधी आजपर्यंत सोडलेली नाही. त्यामुळे दहिवडीत होणाऱ्या या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.’