डाटा बसत नसेल तर मोठा पेनड्राईव्ह आणा, सहकारमंत्र्यांचा दरेकरांना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 04:57 PM2022-03-19T16:57:58+5:302022-03-19T17:00:01+5:30

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला उगाचच टार्गेट करीत आहेत. चुकीचे आरोप करीत सुटले आहेत.

If data does not fit, bring a big pen drive, Co-operation Minister Balasaheb Patil criticizes Pravin Darekar | डाटा बसत नसेल तर मोठा पेनड्राईव्ह आणा, सहकारमंत्र्यांचा दरेकरांना खोचक टोला

डाटा बसत नसेल तर मोठा पेनड्राईव्ह आणा, सहकारमंत्र्यांचा दरेकरांना खोचक टोला

Next

कऱ्हाड : राज्यात महाविकास आघाडीचे काम अत्यंत चांगले चालले आहे. पण त्याला खीळ घालण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. पेनड्राईव्हची भीती दाखवत आहेत. आता तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर साताऱ्यात येऊन पुन्हा तीच भाषा करीत आहेत. त्यांनी हवी ती माहिती गोळा करावी. डाटा बसत नसेल तर मोठा पेनड्राईव्ह आणावा अशी खोचक टीका सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत केली.

मंत्री पाटील म्हणाले, प्रवीण दरेकर यांनी मुंबई जिल्हा बँक निवडणूक ही मजूर संस्था गटातून लढविली होती. त्यावर 'आप ' च्या कार्यकर्त्यांनी हरकत घेतली. त्यानंतर दरेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरेकर हे मजूर या व्याख्येत बसत नाहीत अशी तक्रारदाराची तक्रार आहे. त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता चौकशी सुरू आहे. पण आपल्यावर तक्रार झाल्याने दरेकर यांचा सहकार विभागावर रोष आहे. त्यामुळे ते सातारा येथे येऊन आरोप करीत बसले आहेत. त्यांच्यावर सूड उगवण्याचा कोणताही प्रश्न नाही असेही एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले.

प्रवीण दरेकर आता पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला उगाचच टार्गेट करीत आहेत. चुकीचे आरोप करीत सुटले आहेत. भरपूर पुरावे असल्याचा दावा करीत आहेत. लवकरच पेनड्राईव्ह सादर करण्यात असे म्हणत आहेत. माझा त्यांना सल्ला आहे त्यांनी हवी ती माहिती गोळा करावी आणि डाटा बसत नसेल तर त्यांनी मोठा पेनड्राईव्ह आणावा.

तो निर्णय वरिष्ठ घेतील

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना एम.आय.एम.ने आगामी निवडणुकीत बरोबर घ्यावे अशी साद घातली आहे. याकडे लक्ष वेधले असता मंत्री पाटील म्हणाले याबाबतचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील.

सरकार अजून तरी पडलेले नाही

राज्यातील सरकार लवकरच पडेल असे भाजप नेते सारखे सांगत आहेत. याकडे लक्ष वेधले असता मंत्री पाटील म्हणाले, आजवर भाजप नेत्यांनी अनेक तारखा दिल्या आहेत. मात्र अजून तरी हे सरकार पडलेले नाही. महाविकास आघाडीचे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल . असा मला विश्वास आहे.

Web Title: If data does not fit, bring a big pen drive, Co-operation Minister Balasaheb Patil criticizes Pravin Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.