पायाभूत सुविधा निर्माण झाल्यास कोंडी फुटेल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:52 PM2020-02-22T23:52:11+5:302020-02-22T23:52:36+5:30
क-हाडला भेडसावणारी वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सुटावी, याकरिता आम्ही मध्यरात्री सर्व्हे केले आहेत. रस्ते मोजले आहेत. आराखडा तयार केला आहे. त्याचा पाठपुरावाही सुरू आहे. समस्येपेक्षा उपायावर आम्ही सध्या भर देत आहोत. - सतीश पवार, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक, क-हाड
संजय पाटील।
क-हाड : नियम मोडले तर दंडात्मक कारवाई होतेच; मात्र वाहतुकीचा प्रश्न सोडवायचा असेल तर फक्त कारवाई करून चालणार नाही. कोंडी फोडण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील. मूळच्या रस्त्यांमध्ये बदल तसेच काही गोष्टी नव्याने निर्माण कराव्या लागतील, असे मत कºहाडच्या वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी व्यक्त केले.
प्रश्न : क-हाडातील अंतर्गत रस्त्यांवरील कोंडीचं नेमकं कारण काय?
उत्तर : रस्ते कित्येक वर्षांपूर्वी त्यावेळच्या वाहतुकीचा विचार करून बनवले गेले होते. त्यावेळची वाहनांची संख्या आणि आताची संख्या यामध्ये तफावत आहे. वाढती वाहने आणि अपुरे रस्ते हीच कोंडीची खरी समस्या आहे.
प्रश्न : पालिकेकडून कोणत्या उपाययोजना अपेक्षित आहेत?
उत्तर : शहरातील रस्त्यांची कामे झाली आहेत. मात्र, पांढरे पट्टे, क्रॉसिंग पट्टे मारणे, नो पार्किंग झोन तयार करणे, फलक लावणे, अतिक्रमण हटवणे, आवश्यक त्याठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. त्याबाबत पालिकेशी पत्रव्यवहार आणि सकारात्मक चर्चा झाली आहे.
प्रश्न : शहरातील रस्त्यांवर पार्किंग व्यवस्था पुरेशी आहे का?
उत्तर : मुळातच शहरातील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. सम-विषम पार्किंग हा तात्पुरता पर्याय असला तरी भविष्यातील वाहतुकीचा विचार करता सम-विषम पार्किंग पुरेसे वाटत नाही. पार्किंग झोन किंवा अंतर्गत पार्किंग करणे गरजेचे आहे.
प्रश्न : सिग्नलभोवतीचा वडापचा गराडा का हटत नाही?
उत्तर : सिग्नलभोवती रिक्षा थांबे असू नयेत, अशी आमचीही भूमिका आहे. परिवहन कार्यालय व पालिकेशी त्याबाबत पत्र व्यवहार करून नवीन थांबे निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कोल्हापूर नाका ही जटील समस्या!
कोल्हापूर नाक्यावरील कोंडी आणि अपघात ही मोठी समस्या आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी पेट्रोल पंप ते नाक्यापर्यंत जाणारा रस्ता सरळ करणे, साताऱ्याला जाणारी वाहतूक आयलँडपासून वळवणे, एसटी थांबे हटविणे, नो पार्किंग झोन करणे गरजेचे आहे. नव्याने काही गोष्टींची येथे निर्मिती करावी लागणार आहे.
पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावेत!
क-हाडात पर्यायी मार्ग उपलब्ध होणे गरजेचे आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यास वाहतुकीचा प्रश्न निकालात निघेल. काही रस्ते आहेत. मात्र, ते वापरात नाहीत. आवश्यक ती वाहतूक त्या रस्त्यांवरून वळविणे अपेक्षित आहे. वाहतूक आराखड्यामध्ये माहिती पालिकेकडे दिली आहे. त्याचा पाठपुरावा केला जात असून, पालिका प्रशासनही सकारात्मक आहे.