मम्मी-पप्पा भेटले नाहीत तर ... हा विचार जास्त भीतिदायक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:22+5:302021-06-03T04:27:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : रेल्वेतून जमिनीवर फेकले गेले. रेल्वे पुढे जात होती अन् मी खाली पडलेल्या अवस्थेत मम्मी... ...

If Mommy and Daddy haven't met ... this thought is more frightening! | मम्मी-पप्पा भेटले नाहीत तर ... हा विचार जास्त भीतिदायक !

मम्मी-पप्पा भेटले नाहीत तर ... हा विचार जास्त भीतिदायक !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : रेल्वेतून जमिनीवर फेकले गेले. रेल्वे पुढे जात होती अन् मी खाली पडलेल्या अवस्थेत मम्मी... पप्पा ओरडत होते... किर्रर्र अंधार, सुनसान घाट आणि आजूबाजूला कोणीच नाही. या एकटेपणापेक्षाही मला मम्मी-पप्पा कधीच भेटणार नाहीत, याची भीती जास्त होती... वाऱ्याची झुळूक आली की पाय दुखायचा आणि मी विव्हळून मदत मागण्याचा प्रयत्न करायचे... सकाळी उजाडलं तेव्हा भीती गेली... लोक जमले तेव्हा घाबरल्यासारखं झालं, पण त्यांनी मला दवाखान्यात नेलं; काळजी घेतली... अँटी, तुम्ही सांगा ना त्याने मला का फेकून दिलं !

अतिप्रसंग करताना ओरडल्यामुळे निज्जामुद्दीन एक्सप्रेसमधून अंकिता (नाव बदलण्यात आले आहे.) या अवघ्या आठ वर्षांच्या मुलीला धावत्या रेल्वेतून फेकून देण्याचा प्रकार लोणंदजवळ घडला. साताऱ्यात अंकिता उपचार घेत आहे.

अंकिता सांगत होती, आदर्की ते वाठार स्टेशन दरम्यान मध्यरात्री दोन वाजता रेल्वेतून फेकून दिल्यानंतर तिने सांगितलेले वर्णन अंगावर शहारे आणणारे आहे. ती म्हणाली, ‘रेल्वेच्या बर्थवर मला पप्पांनी उचललं असंच वाटलं म्हणून मी त्यांना बिलगले. मला उभं केल्यावर डोळे उघडले तर मी टॉयलेटमध्ये आणि समोर अनोळखी माणूस... त्यांना बघून माझी झोपच उडाली... तो काहीतरी घाण करणार इतक्यात मी त्याला लाथाबुक्क्यांनी मारून जोरात ओरडायला सुरुवात केली... माझा आवाज जास्त बाहेर जाऊ नये म्हणून त्यांनी माझं तोंड दाबलं तरीही मी पायांनी दार वाजवायला सुरुवात केली. शेवटी त्याने मला ‘तुम चुप बैठो मैं छोडता हूँ तुम्हारे मम्मी पापाके पास’ असं म्हटल म्हणून मी गप्प झाले. त्याने मला टॉयलेटमधून उचलून घेतलं... त्यांच्याकडे गेल्यानंतर मी सगळी हकीकत सांगायचं ठरवलं... तो दाराकडे निघाला तेव्हा त्याला काही बोलायच्या आतच त्याने दार उघडून मला फेकून दिलं... रेल्वे दूर चालली होती. माझा आवाज कोणालाच येत नव्हता आणि आजूबाजूला कुठं लाईट पण दिसत नसल्याने मी खूप घाबरून गेले. थोड्या वेळासाठी मला झोप लागल्यासारखं झालं. पण वाऱ्याची झुळूक आली की जखम दुखायची आणि मला जाग यायची. जाग आली की मी पुन्हा विव्हळून हाक मारत होते, पण कोणीच मदतीला आलं नाही."

पीडित अंकिता म्हणाली, "सकाळी मला जाग आली तेव्हा अजिबात हलता येत नव्हतं. काही लोक मला मदत करायला आले, पण हे लोक पण त्याच्यासारखे असले तर... या भीतीने मला घाबरायला झालं. पण मी त्यांना तसं दाखवून दिलं? नाही. पोलीस आल्यानंतर मला धीर आला. त्यांनी दवाखान्यात नेल्यानंतर मम्मी-पप्पा कुठं आहेत हे विचारलं तर त्यांनी ते येताहेत असं उत्तर दिलं? आणि माझी भीती कमी झाली. मम्मी-पप्पा भेटल्यावर मी त्यांना विचारलं, त्या काकांनी मला खाली का फेकलं? त्यांनी उत्तर नाही दिलं. अँटी, तुम्ही सांगा ना मला का फेकून दिलं? आठ वर्षांच्या चिमुकलीच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे कळतच नाही.

चौकट :

''लेक लाडकी''ची माणुसकी

अंकिताला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणल्याची माहिती मिळाल्यानंतर लेक लाडकी अभियानाच्या संचालिका अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी त्यांच्या टीमसोबत पीडिता आणि तिच्या कुटुंबाची भेट घेतली. पूर्णपणे अनोळखी असलेल्या शहरात अभियानाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जेवणाच्या डब्यासह, अंथरूण-पांघरूण देऊन त्यांच्या निवासाची सोय केली. यासाठी कैलास जाधव, अँड. शैला जाधव, प्रा. संजीव बोंडे, अ‍ॅड. वनराज पवार, चित्रा व्ही. एस. यांच्यासह कार्यकर्ते झटत होते.

कोट :

आम्ही गाढ झोपेत असताना हा प्रकार घडला. सकाळी शोधाशोध केल्यानंतर सातारा जिल्ह्यात ती असल्याचं पोलिसांकडून समजल्यावर दिलासा वाटला. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज वाचले होते, पण त्यांचे विचार कृतीतून जिवंत ठेवण्याचं काम महाराष्ट्रात अजूनही सुरू आहे याचं कौतुक वाटलं. या कठीण प्रसंगात आम्हाला मिळालेली मदत दिलासा देणारी आहे.

- पीडित मुलीचे वडील

Web Title: If Mommy and Daddy haven't met ... this thought is more frightening!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.