पॅनेल उभे केले असते तर अविनाश मोहितेंचा उदयच नसता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:26 AM2021-06-28T04:26:44+5:302021-06-28T04:26:44+5:30

कऱ्हाड : ‘कृष्णा कारखान्यात २०१५ ला सत्तेवर आल्यानंतर अनेक अडचणींतून मार्ग काढत कारखान्याला आणि सभासदांना पुन्हा वैभवाचे दिवस आणले. ...

If the panel had been formed, Avinash Mohite would not have emerged | पॅनेल उभे केले असते तर अविनाश मोहितेंचा उदयच नसता

पॅनेल उभे केले असते तर अविनाश मोहितेंचा उदयच नसता

Next

कऱ्हाड : ‘कृष्णा कारखान्यात २०१५ ला सत्तेवर आल्यानंतर अनेक अडचणींतून मार्ग काढत कारखान्याला आणि सभासदांना पुन्हा वैभवाचे दिवस आणले. येत्या काळात कारखान्याच्या साखरेचा ब्रँड देशभर पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. २०१० साली पॅनेल टाकले असते तर अविनाश मोहितेंचा उदय झालाच नसता,’ असा घणाघात कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केला.

रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या वतीने आयोजित प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद नामदेव धर्मे होते. या वेळी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, दयानंद पाटील, गुणवंतराव पाटील, विलास भंडारे, लिंबाजी पाटील, संभाजीराव पाटील, दत्तात्रय देसाई, संजय पाटील, जे. डी. मोरे, शिवाजी पाटील, बाजीराव निकम, सयाजी यादव, बाबासो शिंदे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, जयश्री पाटील, इंदुमती जाखले आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘आम्ही सत्तेवर आलो तेव्हा कारखान्याची स्थिती अत्यंत वाईट होती. कामगारांना द्यायला पैसे नव्हते. तोडणी वाहतुकीसाठी पैसे नव्हते. डिस्टलरी बंद होती. अशा अडचणीच्या काळात आम्ही कारखान्याची जबाबदारी स्वीकारली. आज ६ वर्षांनंतर तुम्हाला दिसेल की आम्ही कारखाना सुस्थितीत आणला आहे. यंदाच्या एफआरपी रकमेतील तिसरा हफ्ता सभासदांनी मागितल्यास ती दुसऱ्याच दिवशी देण्याची तयारी आहे. २०१० साली मनोमिलनाचा शब्द पाळायचा म्हणून कार्यकर्त्यांनी आग्रह केला. तरी आम्ही त्या वेळी पॅनेल उभे केले नाही. पण पॅनेल टाकले असते तर अविनाश मोहितेंचा उदय आणि कारखान्याचे एवढे नुकसान झाले नसते.

सभासदांची आणि कारखान्याची कुठलीही फिकीर दोन्ही विरोधकांना नाही. विरोधकांनी खोट्या सह्या करून कोट्यवधींचे कर्ज उचलले. ज्यांनी कर्ज काढले नाही अशा ७८४ जणांना बँकेच्या नोटिसा आल्याने या लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. हा गुन्हा दाखल झाला असून, यातील दोषी असणारे विरोधी गटाचे लोक जामिनावर बाहेर आहेत. हे लोक आता तुमच्यासमोर मते मागायला येत आहेत, हे लोकांनी लक्षात घ्यावे.’

डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘गेल्या वेळी आम्ही मोफत साखरेचा शब्द दिला होता तो नक्की पूर्ण केला. आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत कृष्णा कारखाना खासगी होणार नाही. तो सहकारीच राहील. आज आम्ही अनेक सहकारी संस्था चालवितो. पण त्यातील एक तरी संस्था खासगी झाली का? हे दाखवून द्या.’

या वेळी माजी संचालक संपतराव थोरात, माणिकराव जाधव, जिल्हा परिषद सदस्या श्यामबाला घोडके, सरपंच सुवर्णा कापूरकर, अशोकराव थोरात, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, संग्राम पाटील, संचालक पांडुरंग होनमाने, व्ही. के. मोहिते, ब्रम्हानंद पाटील, मनोज पाटील आदींसह सभासद उपस्थित होते.

चौकट :

कारखान्याचे वाटोळे केले...

‘२०१० साली अपघाताने सत्तेवर आलेल्या अविनाश मोहितेंमुळे कारखान्याचे वाटोळे झाले. या लोकांनी ७८४ लोकांना कर्जात ढकलले. या कर्ज प्रकरणातून व कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठीच त्यांना सत्तेची हाव आहे. अशा लोकांना कारखान्यापासून दूर ठेवणे गरजेचे आहे, असे मदनराव मोहिते यांनी स्पष्ट केले.

फोटो दि.२७ कऱ्हाड सहकार फोटो...

फोटो ओळ : कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील प्रचार सांगता सभेत डॉ. सुरेश भोसले यांनी मार्गदर्शन केले.

..............................................................

Web Title: If the panel had been formed, Avinash Mohite would not have emerged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.