दर निच्चांकी तर लागवड उच्चांकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:40 AM2021-05-18T04:40:10+5:302021-05-18T04:40:10+5:30
आदर्की : फलटण पश्चिम भागात धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे उसाचे क्षेत्र वाढले; पण कारखान्याकडून हमीभाव व वेळेत बिले मिळत नसल्याने शेतकरी ...
आदर्की : फलटण पश्चिम भागात धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे उसाचे क्षेत्र वाढले; पण कारखान्याकडून हमीभाव व वेळेत बिले मिळत नसल्याने शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळला आहे. आता लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याचे दर निच्चांकी आहेत; पण आगामी काळात भाजीपाल्यास दर मिळेल, या आशेवर आदर्की परिसरात टोमॅटोचे पंचवीस लाख रोपांची लागवड केल्याने दर निच्चांकी, तरीही लागवड उच्चांकी झाली आहे.
फलटण पश्चिम तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती, त्यावेळी एक ते दोन लाख रोपांची लागवड होत असे. त्यावेळी मे-जूनमध्ये टोमॅटो पिकांना टँकरने पाणी घालावे लागत होते. दहा वर्षांपूर्वी धोम-बलकवडी प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे ओढ्यात सोडून पाझर तलाव, बंधारे भरू लागल्याने कालव्या लगतच्या गावात भूगर्भातील पाण्यासाठ्यात वाढ झाल्याने बागायती शेत्रात वाढ होऊन प्रारंभी शेतकरी ऊस शेतीकडे वळला; पण साखर कारखाने हमीभाव वेळेत निश्चित करत नाहीत व उसाची बिले वेळेत देत नसल्याने शेतकरी नगदी पिकाकडे वळला. तो शेवगा, टोमॅटो, गवारी, कोबी, प्लॉवर, मिरची आदी भाजीपाला घेऊ लागला.
कोरोना महामारी, लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत आहेत, त्यामुळे तो तोट्यात गेला आहे; पण आगामी पावसाळी हंगामात टोमॅटो पिकास कायम दर मिळ्तो, या आशेवर आदर्की परिसरात पंचवीस लाख रोपांची लागवड झाली आहे.
चौकट..
टोमॅटोला किलोला आठ ते दहा रुपये दर
यावर्षी नोकऱ्या गमावलेले तरुण मोठ्या प्रमाणात शेती करू लागले. शेतकऱ्यांनी रोपे, ओषधे, खते, काठी, सुतळी यावर कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आता टोमॅटोला प्रतिकिलो आठ ते दहा रुपये दर आहे; पण खर्च वजा जाता शेतकऱ्यास काही मिळत नाही, त्यामुळे दर निच्चांकी, तर लागवड उच्चांकी झाल्याचे चित्र आदर्की परिसरात दिसत आहे.
१७आदर्की
फलटण पश्चिम भागात धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे उसाचे क्षेत्र वाढले; पण कारखान्याकडून हमीभाव व वेळेत बिले मिळत नसल्याने शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळला आहे.