शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
By नितीन काळेल | Published: April 27, 2024 06:35 PM2024-04-27T18:35:41+5:302024-04-27T18:36:39+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोखठोक इशारा दिला.
सातारा : "देशातील सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करीत आहेत. पंतप्रधानांवर टीका केली म्हणून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आत टाकले. महाराष्ट्रातही असाच प्रकार सुरू आहे. साताऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे कामगार नेते आहेत. त्यांनाही काहीही करून अडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत; पण शिंदे यांना अटक झाली तर संघर्ष करू अन् सातारा आणि महाराष्ट्र अन्याय सहन करत नाही हे दाखवून देऊ," असा रोखठोक इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
दहीवडी, ता. माण येथे माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासाठी आयोजित सभेत पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, उत्तम जानकर, प्रभाकर देशमुख, सुभाष नरळे, अनिल देसाई, रणजितसिंह देशमुख, सुरेंद्र गुदगे, अभयसिंह जगताप, संजय भोसले आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, "देशाची सत्ता नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे. त्यांचा देशाच्या संसदीय लोकशाहीवर विश्वास नाही. यामुळे आपण अशा लोकांना सत्ता द्यायची का, याचा विचार करावा. सत्ता लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते; पण हेच राज्यकर्ते सत्तेचा चुकीचा वापर करत आहेत. विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे."
प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामुळे भाजपचा तिळपापड झालाय. आता भाजपने ४०० पारचा नाराही बंद केला आहे. राज्यात आघाडी एकसंध असून, महायुतीला उमेदवार ठरवता येत नाहीत. उसने उमेदवार घेऊन त्यांना लढावे लागते अशी स्थिती आहे."
कडक उन्हात १४ मिनिटे भाषण
माण तालुक्यात कडक उन्हाळा आहे. दहीवडीची सभा तर दुपारी १२ वाजता सुरू झाली. कडक उन्हातही नागरिक शरद पवार यांचे भाषण ऐकण्यासाठी आतुर होते. त्यामुळे जागेवरून कोणीही हलले नाही. दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी पवार यांनी भाषणाला सुरुवात केली. आपल्या १४ मिनिटांच्या भाषणात त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.