उसाला दर हवा; शेतकऱ्यांनो जरा थांबा; ‘स्वाभिमानी’चे आवाहन
By नितीन काळेल | Published: December 7, 2023 07:26 PM2023-12-07T19:26:54+5:302023-12-07T19:27:10+5:30
आणखी चांगल्या दरासाठी साथ द्या
सातारा : सातारा जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी पहिला हप्ता ३१०० रुपये जाहीर केला आहे. तरीही शेतकरी संघटनांच्या ३५०० रुपयांची मागणीने ऊसदराची कोंडी फुटलेले नाही. तरीही कारखान्यांनी उसाचे गाळप गतीने सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला दर हवा असल्यास शेतकऱ्यांनी जरा थांबावे. दराची स्पर्धा सुरू असून आणखी चांगला दर मिळण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. यावरुन ऊसदराची ठिणगी पेट घेणार का ? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी स्वाभिमानीच्या आंदोलनाची दखल घेऊन मागील हंगामातील ऊस बिल ५० ते १०० रुपये शेतकऱ्यांना दिले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री, कोल्हापूर पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मिळून हा तोडगा काढला होता. तो संपूर्ण साखर उद्योग करणारे सांगली व साताऱ्यासाठही लागू करण्यात यावा. तसेच याबाबत कारखानदारांनीही स्पष्ट भूमिका मांडावी. कारण, सातारा जिल्ह्यातील काही साखर कारखाने भाडे तत्त्वावर देण्यात आले आहेत. त्यांना मुळ संस्थेला भाडे द्यावे लागते तरीही ते ३१५१ पहिली उचल देत आहेत यावरुन ज्यांना भाडे द्यावे लागत नाही त्यांचा दरही मागील हंगामात व यंदा जवळपास एकच कसा असा प्रश्न आहे.