ठेकेदारांमुळे कामांना विलंब झाल्यास काळ्या यादीत टाका, मंत्री शंभूराज देसाईंनी दिल्या सूचना
By नितीन काळेल | Published: September 5, 2022 06:55 PM2022-09-05T18:55:13+5:302022-09-05T18:56:15+5:30
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक शिंदे गट आणि भाजप एकत्र लढविणार
सातारा : ‘मुख्यमंत्री जिल्ह्याचे आहेत. त्यामुळे विकासासाठी निधी कमी पडणार नाही. मेडिकल कॉलेजची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम होईल. तर जलसंपदामधील प्रकल्पांना ठेकेदारांमुळे विलंब होत असल्यास त्यांना काळ्या यादीत टाका अशी सूचना केली आहे,’ अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले, ‘जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील महत्वाच्या तीन विषयांवर अधिकाऱ्यांची बैठक झाली. साताऱ्यात मेडिकल कॉलेज होत आहे. याबाबतच्या मुनष्यबळाबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आलाय. अर्थसंकल्पात बांधकामासाठी निधीची तरतूदही केली आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भूमिपूजन करण्यात येणार आहे. आता १०० जणांची बॅच आहे. दुसरी बॅचही लवकरच येईल. यापुढे मेडिकल कॉलेजच्या कामाला गती देण्यात येणार आहे. त्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करु.
जिल्ह्यात जलसंपदा विभागाचे काही मोठे प्रकल्प आहेत. धोम-बलकवडी आणि जिहे-कठापूर योजनेला गती देणार आहे. भूसंपादनाचा विषय थांबला असून जिल्हाधिकारी तो मार्गी लावतील. वाटाघाटीने जमिनी घ्यायच्या झाल्यात तर त्यासाठी पैसे देण्यात येतील. कृष्णा खोरेमधील कामांना गती देण्यासाठी महिन्यातून एक बैठक घेऊ. पण, ठेकेदारांमुळे कामांना विलंब होणार असेल तर त्यांना काळ्या यादीत टाका, अशी सूचना अधिकाºयांना केली आहे, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील तापोळा येथे दोन मोठे पूल उभारण्यात येणार आहेत, असे सांगून मंत्री देसाई पुढे म्हणाले, ‘ मुख्यमंत्री हे जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे निधी कमी पडणार नाही. प्रलंबित कामांसाठीही निधी मिळेल. त्यासाठी विभागांनी कार्यालयातील एक अधिकारी मंत्रालयातील कामासाठी द्यावा. जिल्हा रुग्णालयाबाबात काही तक्रारी आहेत. त्याविषयी जिल्हाधिकारी माहिती घेतील. त्यानंतर आम्ही दोघेही रुग्णालयाला भेट देऊ.
पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे...
- पाटणला १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय अंतिम टप्प्यात
- पाटणला प्रशासकीय इमारत बांधणार. सर्व कार्यालये एकाच इमारतीत.
- पोलिसांच्या १४ हजार पदांची भरती. दिरंगाई होणार नाही.
- शिंदे गट मोठा करायचा आहे. येणाºयांचे स्वागत.
- स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक शिंदे गट आणि भाजप एकत्र लढविणार