घरात गॅस असेल तर रॉकेल विसरा! दिवा पेटवायचा कसा?
By admin | Published: September 21, 2015 09:00 PM2015-09-21T21:00:08+5:302015-09-21T23:45:35+5:30
ग्रामीण भागात भारनियमनाची धास्ती; कंदीलही विझणार कोपर्डे
हवेली : रॉकेलचा उपयोग शहरी भागासह ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात केला जातो; पण गत काही दिवसांत शासनाने गॅस सिलिंडर धारकांचे रॉकेल बंद केल्याने ग्रामीण भागातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. भारनियमनामुळे वीज खंडीत झाल्यास आता दिवा पेटवायचा कसा? असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातून रॉकेल विक्रेत्यांना काही दिवसांपुर्वी परिपत्रक पाठविण्यात आले आहे. १ व २ गॅस धारक शिधापत्रिकाधारकांना रॉकेल वाटप करायचे नाही, शहरी तसेच ग्रामीण भागातील बिगर गॅस धारकांसाठी एका व्यक्तीला २ लिटर, दोन व्यक्तींसाठी ३ लिटर, ३ किंवा ४ व्यक्तींना ४ लिटरप्रमाणे (उपलब्धतेनुसार) प्रतिमहिना रॉकेल वाटप करायचे, अशी सूचना देण्यात आली आहे. वास्तविक, नित्याची गरज म्हणून ग्रामीण भागात रॉकेलचा उपयोग होत असतो. सध्या गणपती उत्सव तसेच काही दिवसांवर दिवाळी आली असताना शासनाचा निर्णय पचनी पडणारा नसल्याने अनेकांनी या निर्णयाला विरोध करण्याचे ठरविले आहे. ग्रामीण भागामध्ये अजूनही चुलीचा वापर करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पावसाळ्यामध्ये किंवा ओले जळण असल्यास ते पेटविण्यासाठी केरोसिनचा वापर करण्यात येतो. त्यामध्ये अधूनमधून भारनियमन सुरू असते. इनव्हर्टरचा वापर करणाऱ्यांची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे अंधाऱ्या रात्रीत दिवा लावावा लागतो. त्याचवेळी रॉकेलची खरी किंमत कळते. ग्रामीण भागात रात्री शिवारात जात असताना अजूनही शेतकरी कंदिलाचा वापर करतात. तसेच अचानक गॅस संपल्यास स्टोव्हवर स्वयंपाक करणाऱ्यांची संख्या लक्षात घेण्यासारखी आहे. गॅसधारकांशिवाय शासन रॉकेलचा पुरवठा करणार असले तरी तोही पुरवठा मर्यादित आहे. सण उत्सव, घरगूती कार्यक्रमासाठी रॉकेलची गरज लागते. लहान हॉटेल व्यवसायीक अजूनही पदार्थ तयार करण्यासाठी इंधन म्हणून रॉकेलचा वापर करतात. त्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. (वार्ताहर)