आम्ही ‘शब्द’ देत नाही तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:45 AM2021-09-15T04:45:33+5:302021-09-15T04:45:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘महाराष्ट्रात सातारा विकास आघाडी एकमेव अशी आघाडी असेल जी केलेली कामे लोकांपुढे जाहीरपणे मांडते. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘महाराष्ट्रात सातारा विकास आघाडी एकमेव अशी आघाडी असेल जी केलेली कामे लोकांपुढे जाहीरपणे मांडते. कारण, आम्ही केवळ ‘शब्द’ देत नाही तर पाळतो देखील. हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागात वीज, पाणी आणि रस्ते अशा मूलभूत सेवांची पूर्तता करणे हे आघाडीचे कर्तव्य आहे. येत्या काही दिवसांत ही कामे प्रत्यक्ष सुरू केली जातील,’ अशी ग्वाही सातारा विकास आघाडीचे प्रमुख तथा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
सातारा शहर प्रकाशमान करण्याचे उद्दिष्ट सातारा पालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडीने ठेवले आहे. या उद्दिष्टांच्या पहिल्या टप्प्यात शहरात पाच ठिकाणी पथदिव्यांचे उद्घाटन खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी सात वाजता करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक दत्तात्रय बनकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, ‘हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या शाहूनगर, विलासपूर, करंजे तसेच खेड ग्रामपंचायत या क्षेत्रांतील काही भागांना तब्बल चार दशके विजेची सोय नव्हती. त्यामुळे येथील रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पालिकेने जनरल फंडातून पन्नास लाख रुपये खर्च टाकून पथदिव्यांचे काम पूर्ण केले. या भागात वीज तसेच रस्ते, पाणी अशा मुलूभत सेवा-सुविधा उपलब्ध करणे हे पालिकेचे व आघाडीचे कर्तव्य आहे. पहिल्या टप्प्यांत रस्त्यांची कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील. वाढीव भागातील तरुणांसाठी खेळाचे मैदान उभारण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. शाहूपुरी भागाला वरदान ठरणाऱ्या कण्हेर पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन पुढील आठवड्यात केले जाईल, असेही ते म्हणाले.
फोटो : १४ उदयनराजे भोसले
सातारा शहरातील पथदिव्यांचे उद्घाटन मंगळवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माधवी कदम, मनोज शेंडे आदी उपस्थित होते.