रोजगारच नसल्यानं मुंबईत राबावं लागतं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 10:48 PM2019-04-08T22:48:54+5:302019-04-08T22:48:59+5:30
सातारा ते मेढा 29 किमी लोकमत न्यूज नेटवर्क सायगाव : जिल्ह्यात मोठे उद्योगधंदेच नाहीत. एकाही तालुक्यात सक्षम उद्योग नाही. ...
सातारा ते मेढा
29 किमी
लोकमत न्यूज नेटवर्क
सायगाव : जिल्ह्यात मोठे उद्योगधंदेच नाहीत. एकाही तालुक्यात सक्षम उद्योग नाही. इतर तालुक्यात शेती व्यवसायासाठी पुरेशा सुविधा तरी आहेत. मात्र जावळीत तशी परिस्थिती नाही, त्यामुळे जावळीकरांच्या नशिबी मुबंईत जाऊन माथाडीतच राबावं लागतं. त्यामुळे नेमका विकास काय झाला, यावर सातारा-मेढा प्रवासात खुमासदार चर्चा रंगली होती.
जावळी तालुक्याला उपयोगी पडणारे महू-हातगेघर धरण १९९५ ला सुरू झाले. मात्र वीस वर्षे होऊनही धरण अर्धवट आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न अर्धवट आहे. धरण पूर्ण झालं तर पुढील पिढीची तरी माथाडीमधील ओझ्यातून सुटका होईल, अशी अपेक्षा जावळीकरांना वाटते; पण याकडे कोणता लोकप्रतिनिधी लक्ष देईल, असे दिसत नाही.
जावळी तालुक्यातील युवकांना आजही महाविद्यालयीन शिक्षणासाठी सातारा शहरात यावे लागते. जिल्ह्याच्या ठिकाणापासून मेढा जवळ असूनही इथं एकही अभियांत्रिकीचे महाविद्यालय नाही. पदवीपर्यंतच उत्तम शिक्षण देणारे कॉलेज नाही, त्यामुळे चांगल्या शिक्षणासाठी बाहेरच जावं लागतं. अशी खंत साताऱ्यातील कॉलेज संपल्यानंतर घरी परतत असलेल्या तरुणांनी ‘लोकमत आॅन व्हील’मध्ये बोलताना व्यक्त केली.
राष्ट्रीय की स्थानिक मुद्दा?
अतिपर्जन्यवृष्टीच्या जावळी तालुक्यात अनेक गावे ऐन उन्हाळ्यात तहानलेली असतात. केळघर विभागातील अनेक गावांना उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो.
कोण निवडून आले काय आणि कोणाचं सरकार आले तरी डोक्यावरील पाण्याचा हंडा काय उतरला जाणार नाही, अशी खंत महिलेने प्रवासात व्यक्त केली.