दणदणाट कराल तर तुरुंगात!
By admin | Published: August 31, 2014 12:19 AM2014-08-31T00:19:04+5:302014-08-31T00:20:09+5:30
पोलीस मोजणार ध्वनितीव्रता : नियमभंग करणाऱ्या मंडळावर होणार कारवाई
कऱ्हाड : गणेशोत्सवात ध्वनीक्षेपकाचा होणारा अतिवापर नवीन नाही; पण डॉल्बीची थापी रचून दणदणाट करणाऱ्या मंडळांची संख्या सध्या भलतीच वाढलीय. हा दणदणाट रोखण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न झालेत. मात्र, तरीही काही अतिउत्साही कार्यकर्त्यांना समज आलेली नाही. त्यामुळे यावर्षी पोलीस दलाने कडक धोरण अवलंबले असून, ध्वनीमर्यादा ओलांडणाऱ्या मंडळावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतलाय.
गणेशोत्सव कालावधीत कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जातात. ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात येतो. मात्र, सध्या बंदोबस्ताबरोबरच पोलिसांना मंडळांच्या ध्वनीतीव्रतेवरही लक्ष केंद्रित करावे लागत आहे. मंडळांकडून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी गणेशोत्सवापूर्वी पंधरा दिवस अगोदरच पोलिसांकडून हालचाली केल्या जातात. शांतता समिती, गुन्हे नियंत्रण समिती तसेच गणराया अॅवॉर्ड समितीची बैठक घेतली जाते. त्या बैठकीत ध्वनी मर्यादेबाबत सविस्तर माहिती देण्यात येते. तसेच सर्व संघटना, गणेश मंडळांची एकत्रित बैठक घेऊन त्यांना त्याबाबत सूचनाही केल्या जातात. मात्र, एवढे करूनही अनेकवेळा मंडळांकडून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केले जाते.
न्यायालयाच्या निर्देषानुसार क्षेत्रनिहाय ध्वनीमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास यापूर्वी पोलिसांकडून संबंधित मंडळाला समज देण्यात येत होती. कधी-कधी दंडात्मक कारवाईही व्हायची; पण तरीही ध्वनी तीव्रतेबाबत मंडळांकडून योग्य खबरदारी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे सध्या पोलिसांनी कडक धोरण अवलंबले आहे. (प्रतिनिधी)
एक लाख दंड, तीन वर्षे शिक्षा
ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी अथवा ध्वनीक्षेपकाचा आॅपरेटर, मालक व मंडळाच्या कार्यकारिणीवर पोलिसांकडून तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच ध्वनीक्षेपकाची सामूग्रीही जप्त केली जाणार असून, ध्वनीमर्यादा उल्लंघन करणाऱ्यास कायद्यानुसार एक लाख रुपये दंड अथवा तीन वर्षे कारावास, अशी शिक्षा आहे.
...अशी होणार कारवाई
ध्वनीतीव्रता जास्त वाटल्यास पोलीस ठाण्याला माहिती कळवावी
दूरध्वनीवर तक्रार आल्यास तत्काळ संबंधित ठिकाणी तपासणी
गस्त पथकाला ध्वनीक्षमता जास्त जाणावल्यास मोजमाप
कारवाई करून ध्वनीक्षेपकासह इतर सामूग्री जप्त
तपासणीची चित्रफीत
४ध्वनीमर्यादा ओलांडणाऱ्या मंडळावर कारवाई केल्यानंतर काहीवेळा वाद उद्भवतो. मर्यादा ओलांडलीच नव्हती, असा बचाव मंडळाची कार्यकारिणी व ध्वनीक्षेपकाचा मालक, आॅपरेटरकडून होतो. त्यामुळे यावर्षी तपासणीवेळी पंचांसमक्ष चित्रीकरण करून ध्वनीक्षेपकांची ध्वनीतीव्रता तपासण्यात येणार आहे.
एक कर्मचारी, एक मशीन
४गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला ध्वनीतीव्रता मापक मशीन पुरविण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी ध्वनीतीव्रता तपासण्यासाठी नेमण्यात आला असून, संबंधित कर्मचाऱ्याने वेगवेगळ्या मंडळांच्या ठिकाणी आवाजाची तीव्रता तपासून त्याबाबत वरिष्ठांना माहिती द्यावयाची आहे.