हिम्मत असेल तर चौकशी लावाच!
By admin | Published: September 30, 2015 10:20 PM2015-09-30T22:20:45+5:302015-10-01T00:29:03+5:30
आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत,’ असे जाहीर आव्हान यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी दिले.
कऱ्हाड : ‘कृष्णा कारखान्यात डॉ. सुरेश भोसले गटाची सत्ता येऊन तीन महिने लोटले आहेत. कारखान्यावर ५२0 कोटींचे कर्ज आहे, असा डांगोरा पिटून सभासदांची दिशाभूल सुरू आहे. त्यांनी या कर्जावू आकड्यांची जबाबदारी नक्की कोणाची व कारखान्यात शिल्लक असणाऱ्या मालाबाबतची वस्तुस्थिती लपवली आहे. त्यांनी खोटे बोलणे सोडून द्यावे. सर्वसाधारण सभेत संस्थापक पॅनेलच्या सत्ता काळातील कारभाराची चौकशी करण्याचा ठराव भोसलेंनी केला आहे. त्यांनी हिम्मत असेल तर चौकशी जरूर लावावी, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत,’ असे जाहीर आव्हान यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी दिले. कृष्णा कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अॅड. रवींद्र पवार, बाळासाहेब शेरेकर, अशोकराव थोरात, डॉ. अजित देसाई यांच्यासह संस्थापक पॅनेलचे कारखान्यातील संचालक उपस्थित होते.
अविनाश मोहिते म्हणाले, ‘आज साखर उद्योग अडचणीत आहे. गेल्यावर्षी एफआरपीप्रमाणे कोणतेही कारखाने दर देऊ शकले नाहीत. अगदी जयवंत शुगरही त्याला अपवाद नाही. मात्र विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले वस्तुस्थितीचा विपर्यास करत आहेत. कारखाना आर्थिक अडचणीत असल्याच्या थापा ठोकून आपले वैयक्तिक हित त्यांना साधायचे आहे. कारखान्याची आर्थिक अडचण सांगून सर्वसाधारण सभेला मंडप घालण्यासाठीपैसे नाहीत, असे सांगणारे भोसले कारखान्याच्या आवारात लाखो रुपये खर्च करून नियोजन भवन कशासाठी उभे करताय,’ असा सवालही त्यांनी केला.
कारखान्याच्या हितासाठी आमचा त्यांना जरूर पाठिंबा आहे; परंतु चुकीच्या धोरणांना विरोधच राहणार. कारखान्यात ज्यावेळी त्यांनी सत्ता हस्तगत केली, त्यावेळी जून महिन्यात ११ लाख साखरपोती आणि १९ हजार ५०० टन मोलॅसिस होते. डिस्टिलरी त्यांच्याच हस्तकांनी केलेल्या खोट्या तक्रारींमुळे बंद पडली.
कधी नव्हे असला इतिहास त्यांच्या १९९९ ते २००५ च्या काळात घडला होता. आता त्यात नवनवीन अशी भरच ते त्यात टाकणार आहेत. हे सत्तेत आले आणि कामगारांचे पगार बंद झाले. कारखान्याकडे पैसे नाहीत, हे चित्र निर्माण करण्यासाठी हे चालले आहे.
कारखान्याकडे कर्जे पंधरा ते वीस वर्षांपासून आहेत; मात्र ते आमच्या माथी खपविण्याचा प्रयत्न आहे. कारखान्यात कामगारांची जादा भरती केली म्हणता म्हणून सुमारे आठशे कामगार कमी केलेत; मग त्याचवेळी दुसरीकडे नवीन कामगार भरती कशी काय सुरू आहे? असा सवाल करत २७ खातेप्रमुखांचे राजीनामे जबरदस्तीने लिहून घेऊन सुडाचे राजकारण सुरू केले आहे, ते बंद करा; अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.
ही कसली मोफत साखर
निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करायचे म्हणून मोफत साखरेचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पण ही साखर सभासदाला कारखान्यावर जाऊन वर्षातून एकदा ६0 किलो घ्यावयाची आहे. कारखान्याचे कार्यक्षेत्र लक्षात घेता ही मोफत साखर सभासदाला गोड लागेल का? त्यांना म्हशीपेक्षा रेडकू मोठे वाटू नये त्यापेक्षा पूर्वीप्रमाणेच गट आॅफिसवर ही साखर मोफत उपलब्ध करून द्यावी म्हणजे सभासदाला खऱ्या अर्थाने लाभ होईल.
पुस्तिकेचे प्रकाशन
सत्ताधारी भोसले गटाने संस्थापक पॅनेलवर केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी कृष्णा सहकारी साखर कारखान्याची खरी आर्थिक स्थिती व निवडणुकीतील भ्रष्टाचार याबद्दलची एक माहिती पुस्तिका तयार करण्यात आली असून, अविनाश मोहिते व मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले.